जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळांपासून विद्यार्थ्यांना मुक्ति देण्यासाठी १५ कोटींची मागणी केल्यानंतर तब्बल ३० कोटींचा भरभरून निधी देणारे पालकत्व हरपले : डॉ. गणेश ढवळे
बीड :- (दि. २९)बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक शाळा मोडकळीस आलेल्या व धोकादायक स्थितीत आहेत. जिल्ह्यातील ९४ शाळांकडे स्वतःची इमारत नाही, तर ३८१ शाळांमधील ६०७ वर्गखोल्यांना तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. पावसाळ्यात छप्पर कोसळणे, भिंती पडणे आणि विद्यार्थ्यांना इजा होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे निवेदने व आंदोलनांद्वारे सातत्याने निधीची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा नियोजनमधून १४ कोटी ८५ लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र दोन वर्षे निधी मंजूर होत नव्हता.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर, डॉ. ढवळे यांनी सातत्याने लक्ष्यवेधी आंदोलने करत निधीची मागणी लावून धरली. याची दखल घेत पालकमंत्री अजितदादा पवार यांनी
शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये
नवीन शाळा इमारत बांधकामासाठी १६ कोटी ५० लाख रुपये
अशी तरतूद मंजूर केली.
नियमानुसार दीडपट कामे हाती घेतली जाणार असल्याने एकूण २९ कोटी ७५ लाख रुपयांचा खर्च करून दुरुस्ती व नवीन बांधकाम सुरू होणार आहे. त्यामुळे शाळांच्या मुलभूत सुविधांसाठी केवळ १५ कोटींची मागणी असतानाही तब्बल दुप्पट म्हणजे जवळपास ३० कोटींचा निधी मंजूर करणारे पालकत्व आता हरपल्याची भावना डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
बीेडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असल्याचा अनुभव असल्यामुळेच बीड तालुक्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ६ वी वर्गातील अंकीता कवचट हिने थेट पालकमंत्री अजित पवार यांना “अजितकाका” संबोधत लेखी पत्राद्वारे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची अवस्था व शैक्षणिक साहित्याबाबत मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती.
आता अजितदादांच्या जाण्याने शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून मदतीचा आधार उठल्याची भावना निर्माण झाली आहे.
बीडसाठी भरभरून मदत करणाऱ्या पालकत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली — अशी भावना डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment