फलटण येथील घटनेतील आरोपीना तात्काळ फाशी द्या सावता सेनेच्या वर्षा शिंदे यांची मागणी
पाटोदा (प्रतिनिधी) फलटण येथे घडलेली अमानुष व संतापजनक घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. वडवणी येथील डॉ. स्व. संपदा मुंडे यांच्या दुःखद निधनाने समाजमन हेलावून गेले असून या घटनेबाबत सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. सावता सेना माहिला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्षा
वर्षा शिंदे यांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.वर्षा शिंदे म्हणाल्या की, “डॉ. संपदा मुंडे या एक संवेदनशील, अभ्यासू आणि समाजाभिमुख वैद्यकीय अधिकारी होत्या. त्यांच्यावर झालेला अत्याचार आणि निधन ही केवळ एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची शोकांतिका आहे. अशा घटना समाजाच्या संवेदनशीलतेला तडा देणाऱ्या असून त्यामागील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने केवळ घोषणांपुरते न थांबता, ठोस कायदेशीर आणि सामाजिक उपाययोजना राबवायला हव्यात. प्रत्येक शहरात व गावात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, तसेच गुन्हेगारांना भीती वाटेल अशी कडक यंत्रणा उभी करणे, हीच खरी काळाची गरज आहे.” वर्षा
शिंदे यांनी प्रशासन आणि सरकारकडे मागणी केली की, या घटनेतील आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून अशा प्रवृत्तीला समाजात आळा बसेल. त्यांनी समाजातील सर्व घटकांना आवाहन केले की, “महिलांविरोधातील अन्यायाविरुद्ध आपण एकत्र उभे राहूया आणि समाजात भीतीमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू या.” या प्रसंगी सावता सेनेच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉ. संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच आरोपींना तातडीने अटक करून फासावर लटकवावा अशी मागणी केली ही घटना केवळ एका वैद्यकीय अधिकार्याची नाही, तर संपूर्ण महिला समाजाच्या सुरक्षेची परीक्षा आहे. समाजाने यावर एकजूट दाखवून अशा प्रवृत्तींचा निषेध करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे मतही सावता सेना माहिला आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्षा वर्षा शिंदे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment