पोलिसांच्या अत्याचाराने संपदा मुंडेंचा जीव घेतला, रक्षकच भक्षक झाले,कठोर कारवाईची मागणी- राज्य प्रवक्ते नितीन सोनवणे



बीड, दि. २४ ऑक्टोबर २०२५ (विशेष प्रतिनिधी): सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गेल्या रात्री टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केली. हातावर पेनाने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलिस निरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार आणि दुसऱ्या पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर याच्यावर शारीरिक-मानसिक छळ केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने तात्काळ दोषींवर कठोरात्कठोर कारवाई करून पीडितेच्या आई-वडिलांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.डॉ. संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील साध्या शेतकरी कुटुंबातील होत्या. आई-वडिलांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांना शिकवून डॉक्टर आणि नंतर वैद्यकीय अधिकारी बनवलं. डॉ. मुंडे यांनी वरिष्ठांकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या होत्या. "माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन," असा इशाराही त्यांनी दिला होता. 

मात्र, प्रशासनाने त्यांच्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि परिणामी ही दुर्दैवी घटना घडली. सुसाईड नोटमध्ये खासदार आणि त्यांच्या स्वीय सचिवाचा उल्लेख असल्याचंही समोर आलं असून, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना प्रशासनावरून आक्रमक टीका केली आहे.

 "न्याय_मिळावा" बीड जिल्ह्याची लेक, फलटण येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या डॉ.संपदा मुंडे यांच्यावर आत्महत्या करण्याची दुर्देवी वेळ आणणाऱ्या नराधमांना तात्काळ आणि कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे," असा संदेश त्यांनी दिला. सोनवणे म्हणाले, "प्रशासनाने कडक कारवाई करून या ताईला आणि तिच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यावा.आईवडिलांनी लेकिला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत लेकीला शिकवलं, डॉक्टर बनवलं, अधिकारी बनवलं, लेकिने प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष केला, आईवडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस कष्ट करून यश मिळवलं आणि काही गिधाडांच्या, श्वापदांच्या अतिरेकी कृत्याचे एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं, मायबापांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडाल्या असतील. त्या गिधाडांना, हिंस्र श्वापदांना सोडता कामा नये. न्याय मिळावा अशी अपेक्षा!"सोनवणे यांनी पुढे सांगितलं, "रक्षकच जर भक्षक होत असतील तर 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रिद वाक्य घेऊन चालणाऱ्या पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन होतेय. कठोर कारवाई व्हायला हवी!" या प्रकरणात फलटण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, साताराचे एसपी दोषी जी यांनी तात्काळ चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे. मात्र, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सातारा आणि फलटणमध्ये निदर्शनांचा इशारा दिला असून, पीडितेच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.या घटनेने वैद्यकीय संघटना आणि महिला संघटनांमध्येही रोष निर्माण झाला आहे. दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, हे प्रकरण संघटनेच्या न्यायालयात घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या अकाली मृत्यूमुळे फलटण शहरात शोककळा पसरली असून, प्रशासनाने तातडीने न्याय दिला नाही तर मोठा गोंधळ होईल, असा इशारा नितीन सोनवणे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना बीड यांच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी