डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने
डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — चौसाळा बसस्थानक येथे निदर्शने
बीड:- ( दि.२५) सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या बीड जिल्ह्याच्या भुमिकन्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या मार्गदर्शनात शिवशक्ती भीमशक्ती विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२५ शनिवार रोजी चौसाळा बसस्थानक येथे सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
डॉ. संपदा मुंडे (रा. कोठारबन, ह.मु. कवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) यांनी फलटण येथे कार्यरत असताना पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर यांच्या शारीरिक व मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर आत्महत्येचे कारण लिहिले होते, तसेच घरच्यांना “शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जातो” असे सांगितले होते. त्यांनी यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती, मात्र वेळेत कारवाई न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंडे कुटुंबियांनीही “बीड जिल्ह्याची मुलगी असल्यामुळे तिच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात आले” असा गंभीर आरोप केला आहे.
आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की —
या प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.
आत्महत्येस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर व अन्य दोषींवर कठोर कारवाई करावी.
तसेच शवविच्छेदन अहवालात हस्तक्षेप करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत.
रिपाई जिल्हा उपाध्यक्ष बापुराव पवार,माजी सभापती काकासाहेब जोगदंड, श्रीमंत सोनावणे पांडुरंग, शिवसंग्राम नेते पांडुरंग आवारे, कल्याण महाराज जगताप, प्रदेशाध्यक्ष छत्रपती राजेशाहु महाराज विचारमंच विवेक कुचेकर,प्रा.आबासाहेब जाधव,बळीराम राऊत,मुस्तफा पठाण,आजिनाथ सोनावणे, सोहेल पठाण, प्रमोद नाईकवाडे, संतोष बोरखेडे, आत्माराम नाईकवाडे, उत्तम जाधव, लिंबाजी तांदळे , पत्रकार एन टी.वाघमारे, विकास नाईकवाडे , चौसाळा पोलिस ठाण्याचे सचिन मुरूमकर,सचिन गर्जे उपस्थित होते.
आदी आंदोलनात सहभागी होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Comments
Post a Comment