भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच....
 
गेवराई (प्रतिनिधी) - दि.१३ जून २०२६ 
भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी यात्रा" काल रात्री गेवराई तालुक्यातील विलासनगर येथे पोहोचली.
    विलासनगर या ठिकाणी मागील काही वर्षांपासून नाथपंथी डवरी गोसावी,वडार समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शहराबाहेर असलेल्या विलासनगर येथे हा समाज पालाच्या घरात राहत आहे. भारत स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले तरी आजही भटके विमुक्त समाजाला घर, मुलांना शिक्षण, रोजगार, शेती, निवासी जागा उपलब्ध नसल्याने अशा कठीण परिस्थितीतही या समाजाला पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत भटकंती करावी लागते. 
        या कार्यक्रमांमध्ये बोलताना ॲड. डॉ.अरूण जाधव म्हणाले की, एकीकडे भारत देश महासत्ता बनवू पाहत आहे तर दुसरीकडे आजचा भटके विमुक्त समाज हा अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठीच पिढ्यानपिढ्या संघर्ष करीत आहे. त्यांच्या या संघर्षातच कितीतरी पिढ्या उध्वस्त झाल्या. शेती, व्यवसाय, रोजगार नसल्यामुळे हा समाज भिक्षा मागून तसेच मिळेल ते काम करीत आहे. हे काम करीत असताना देखील या समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे व राईनपाडा सारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा समाज उपजीविकेसाठी बाहेर जाण्यास घाबरत आहे. या समाजाला स्वातंत्र्य देशात असुरक्षिततेची भीती वाटते. हे या देशाचे दुर्दैव आहे. गरिबीत जन्म घेणे हे आमचे पाप असेल तर आज करोडो भटके विमुक्त समाज हे पाप भोगत आहे. अशा या नाकर्ते, बेजबाबदार सरकारचा आम्ही निषेध करतो व भविष्यात भटक्या विमुक्त समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे मुशाफिरी फेरी यात्रेचे मार्गदर्शक ॲड.डॉ.अरूण आबा जाधव यांनी शेवटी आवाहन केले.
     आज देशात घरगणना व जनगणना चालू आहे.परंतु यामध्ये भटके विमुक्त समाजाच्या पालाची नोंद शासन करीत नाही हा भेदभाव या गरीबांसोबत का केला जातो? भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क व अधिकार आहे. त्यामुळे महालात, व मोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या श्रीमंतांची नोंद होते मग पालाची नोंद का होत नाही हा सवाल या राज्यकर्त्यांना विचारला पाहिजे. त्यामुळे भटके विमुक्त समाजाने भविष्याचा धोका लक्षात घेऊन जागृत राहिले पाहिजे व आपल्या पालाची नोंद करावी असे आवाहन त्यांनी केले.
      सभेचे आयोजन भूमी अधिकार मोर्चाचे अध्यक्ष कबीरदास कांबळे यांनी केले. यावेळी मुशाफिरी यात्रेचे समन्वयक प्रा संतोष चव्हाण सर यांनी केले. या सभेला विजय शिंदे, भिमा चव्हाण, कृष्णा चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, एकनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, सागर शिंदे, राहुल शेगर, भागवत शिंदे, सुनील चव्हाण, अजय शिंदे, तानाजी शिंदे, बबलू चव्हाण, सुरेश चव्हाण, मानाबाई चव्हाण, गंगुबाई चव्हाण, चंद्रभागा शिंदे, सुनीता शिंदे, मिनाबाई चव्हाण, आशाबाई चव्हाण, मुक्ताबाई चव्हाण, मीराबाई चव्हाण, रंजना चव्हाण, मायाबाई चव्हाण, मनीषा शिंदे आदि उपस्थित होते. आभार दत्ता चव्हाण यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी