परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील
परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील
गुन्हेगारांच्या दहशतीखाली शहर, पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय?;खून, मारामाऱ्या, टोळक्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे सावट
परळी | प्रतिनिधी
एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या परळी शहराची ओळख आता दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत चालली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परळीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात कायदा संस्थेचे तीन तेरा झाले असून पोलीस प्रशासनाचा कसलेही प्रकारचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या बाबत आपण लवकरच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गुन्हेगारीच्या घटना घडूनही संबंधितांवर कठोर आणि धाक निर्माण करणारी कारवाई होताना दिसत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. कायद्याचा धाक उरला नसल्यामुळे गुन्हेगार भररस्त्यात, चौकाचौकात आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे मारामाऱ्या करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परळीत कायद्याचे राज्य आहे की गुन्हेगारांचे? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे शोभेपुरतेच का?
परळी शहरात विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गुन्हे रोखण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली. मात्र प्रत्यक्षात गुन्हे घडल्यानंतरही त्याचा अपेक्षित उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. अनेक घटनांमध्ये आरोपींची दहशत कायम राहते, तर नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यामुळे सीसीटीव्ही यंत्रणा केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यासाठीच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसामान्य नागरिक भयभीत
शहरातील व्यापारी, व्यावसायिक, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंतेचे वातावरण आहे. रात्री उशिरा तर सोडाच, दिवसा देखील अनेक भागांमध्ये नागरिक असुरक्षित वाटत असल्याचे बोलले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून अधिक प्रभावी भूमिका अपेक्षित असताना गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
शहरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गुन्हेगारांवर वेळेत आणि कठोर कारवाई झाली असती तर परिस्थिती एवढी बिघडली नसती, असे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजना, नियमित गस्त, संशयितांवर लक्ष आणि गुन्हेगारांवर धडक कारवाई यांचा अभाव जाणवत असल्याची भावना व्यक्त होत आहे. परळीतील बिघडलेल्या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी ही अत्यंत गंभीर बाब असून याकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
"परळी शहरात नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती उरलेली दिसत नाही. ही परिस्थिती तातडीने बदलली नाही तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होईल. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटनांनी व्यापारी व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
*एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
परळीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न आता जिल्हास्तरावर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
प्रशासन जागे होणार कधी?
दररोज घडणाऱ्या घटनांमुळे परळीकरांच्या मनात भीती आणि अस्वस्थता वाढत आहे. गुन्हेगारांचे धैर्य वाढत असताना प्रशासन मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवून गुन्हेगारीला आळा घालावा, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा शहरात सुरू आहे. परळीकरांना सुरक्षित वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment