पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे
पर्यावरणमंत्री पंकजाताईंनी नगरपरिषद निवडणूकीत दिलेले आश्वासन हवेतच विरले ! बिंदुसरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; नदीचे पुनर्जीवन करा :- डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२१) बीड शहराची जीवनवाहिनी असलेल्या बिंदुसरा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि जैविक कचरा टाकल्यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करून तिचे पुनर्जीवन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी पर्यावरण व वातावरणीय बदल तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बीड नगरपालिका निवडणुकीत बिंदुसरा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र आजही नदीपात्रातील परिस्थिती जैसे थे असून दिलेले आश्वासन हवेतच विरल्याची खंत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली आहे.
नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमित बांधकामे, कचरा टाकणे तसेच जैविक कचऱ्यामुळे प्रदूषण वाढले असून याचा थेट परिणाम बीडकरांच्या आरोग्यावर होत आहे. नदी संवर्धन हा सार्वजनिक हित, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर विषय असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
बिंदुसरा नदी प्रकल्पाचा तातडीने आढावा घेऊन नदीपात्रातील अतिक्रमणे हटवावीत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून नदीपात्रात कचरा टाकला जात असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, तसेच नदीपात्रासाठी फ्लड झोन, ग्रीन झोन, रेड झोन व यलो झोन निश्चित करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भविष्यात १९८९ सारखी पूरस्थिती निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे पूररेषेतील अतिक्रमणांबाबत दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment