परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन
परळी रेल्वे विकासासाठी नागरिकांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन
पिट लाईन, नवीन रेल्वेगाड्या, वंदे भारतसह विविध मागण्यांचा पाठपुरावा
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच रेल्वे प्रवाशांच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे.
शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास असलेले परळी वैजनाथ रेल्वे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या महसूल देणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असूनही अपेक्षित पायाभूत सुविधा आणि रेल्वे सेवांपासून हा परिसर वंचित असल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विविध विकासकामांसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात परळी वैजनाथ जंक्शनचे मध्य रेल्वेमध्ये हस्तांतरण, स्थानकावर पिट लाईन मंजूर करणे, तसेच ज्योतिर्लिंग दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पर्यटक माहिती केंद्र उभारणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच मुंबई-लातूर एक्सप्रेस, मछलीपट्टणम-बिदर एक्सप्रेस आणि हैदराबाद-बिदर इंटरसिटी या रेल्वेगाड्यांचा परळी वैजनाथपर्यंत विस्तार करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय चार ज्योतिर्लिंगांना जोडणारी ‘ज्योतिर्लिंग एक्सप्रेस’, सिकंदराबाद-जम्मू तवी, कन्याकुमारी-उधमपूर, रामेश्वरम-ओखा आणि हैदराबाद-अजमेर या नवीन रेल्वे सेवाही परळी मार्गे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
परळी वैजनाथ, पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांना जोडणारी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर-धनबाद आणि कोल्हापूर-नागपूर या रेल्वेगाड्या दररोज चालविण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन जलालपूर परिसरात नवीन रेल्वे उड्डाणपूल, तसेच शिवाजीनगर व जुन्या बसस्थानक परिसरात भुयारी मार्गांची उभारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी आणि घाटनांदूर-अंबाजोगाई-जामखेड-दौंड या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांसाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
हे निवेदन दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनावर जी. एस. सौंदळे, कैलास तांदळे, चेतन सौंदळे, सत्यनारायण दुबे, श्रीकांत पाथरकर, आर. जी. स्वामी, मिलिंद घाडगे, चित्रा देशपांडे, विद्या खिस्ते, विजया दहिवळ, माऊली आघाव, गजानन कोकीळ आणि शेख होबीह यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
परळीसह बीड जिल्ह्याच्या रेल्वे विकासासाठी या मागण्या मान्य झाल्यास मराठवाड्याच्या आर्थिक, धार्मिक आणि पर्यटन विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment