छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावाचा इशारा; १५ जून रोजी ठिय्या आंदोलन
छाया पांचाळ मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेरावाचा इशारा; १५ जून रोजी ठिय्या आंदोलन
बीड, दि. ११ : बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या छाया गणेश पांचाळ यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी किष्किंधा पांचाळ यांनी प्रशासनाला तीव्र इशारा दिला आहे. या मागणीसाठी दि. १५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
छाया पांचाळ यांचा मृत्यू हा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कथित हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी संघर्ष सुरू असून, विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर आरोग्य परिमंडळ लातूर तसेच अंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चौकशी समित्यांनी सखोल तपास करून संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
या चौकशी अहवालाच्या आधारे संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच प्रकरणात दोषींची कथित पाठराखण केल्याचा आरोप असलेल्या तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय राऊत यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
किष्किंधा पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली पीडित कुटुंबीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले आहे. आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, ठिय्या आंदोलनानंतरही आठवडाभरात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घालण्यात येईल.
तसेच या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास बीड शहर पोलिस, शिवाजीनगर पोलिस, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment