पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील भेगा व ग्रामीण रुग्णालय ते भाकरे वस्ती अप्रोच रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा; टोल वसुली करूनही दुर्लक्ष का? – गणेश बामदळे
पाटोदा (प्रतिनिधी): पाटोदा–मांजरसुंबा मार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच हायवेपासून ग्रामीण रुग्णालय व भाकरे वस्तीला जोडणाऱ्या अप्रोच रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, रुग्णवाहिका व नागरिकांची ये-जा होत असताना संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते गणेश बामदळे यांनी या रस्त्यावरील भेगा व अप्रोच रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे. या मार्गावर वाहनधारकांकडून नियमितपणे टोल वसूल केला जात असताना रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टोल वसुलीचा उद्देश रस्त्यांची देखभाल, सुरक्षितता आणि दर्जा टिकवून ठेवणे हा असताना प्रत्यक्षात रस्त्यांवर भेगा पडणे आणि अप्रोच रस्ते खराब होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून अपघातांचा धोका वाढला आहे.
संबंधित टोल व्यवस्थापन कंपनी व प्रशासनाने तातडीने पाहणी करून रस्त्यावरील भेगा बुजविणे आणि ग्रामीण रुग्णालय ते भाकरे वस्ती अप्रोच रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी गणेश बामदळे यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment