२५० वर्षांचा वटवृक्ष कोसळला! ‘वडाचे गाव’ ही ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी लिंबागणेशकरांचा निर्धार; वटवृक्षांच्या फांद्यांची लागवड

२५० वर्षांचा वटवृक्ष कोसळला! ‘वडाचे गाव’ ही ओळख पुन्हा जिवंत करण्यासाठी लिंबागणेशकरांचा निर्धार; वटवृक्षांच्या फांद्यांची लागवड :- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.६) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरात पूर्वी मांजरसुंभा ते पाटोदा मार्गावर वडाची भव्य झाडे दिसली की ‘लिंबागणेश गाव आले’ अशी ओळख होती. मात्र दोन-तीन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात लिंबागणेश बसस्थानकाजवळील सुमारे २५० वर्षे जुना महाकाय वटवृक्ष कोसळल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य आठवणी या वटवृक्षाशी जोडलेल्या होत्या. पूर्वी गावात चार महाकाय वटवृक्ष होते. त्यापैकी आता ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील एकमेव वटवृक्ष शिल्लक राहिला आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा मानल्या जाणाऱ्या या वृक्षाच्या पडझडीमुळे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

‘वडाचे गाव’ ही पुसट होत चाललेली जुनी ओळख नव्याने निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले असून, मोठ्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची स्मशानभूमी, ग्रामपंचायत परिसर आणि बाजारतळ येथे लागवड करण्यात आली. भविष्यात या फांद्यांचे विशाल वटवृक्षांमध्ये रूपांतर होऊन गावाची ऐतिहासिक ओळख पुन्हा निर्माण व्हावी, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

या उपक्रमात सचिन वाणी, विक्रांत वाणी, सर्पमित्र अशोक जाधव, सय्यद अख्तर, पत्रकार हरिओम क्षीरसागर, बबलू शिंदे, शुभम मंडलिक, रोहित जाधव, भाऊसाहेब वाणी, ओंकार थोरात, शहाजी फाळके आदींनी पुढाकार घेतला.

पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड आणि संवर्धन आवश्यक – डॉ. गणेश ढवळे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना डॉ. गणेश ढवळे यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित केली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पाण्याचा योग्य वापर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी