लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ
लिंबागणेशकरांच्या जडणघडणीचा मुक साक्षीदार २५० वर्षांचा महाकाय वटवृक्ष कोसळला; ग्रामस्थांमध्ये हळहळ
– डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (प्रतिनिधी): बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील बसस्थानक परिसरात उभा असलेला जवळपास अडीचशे वर्षांचा महाकाय वटवृक्ष दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अखेर कोसळला. चार-पाच पिढ्यांच्या सुखदुःखाचा मुक साक्षीदार असलेला हा वृक्ष उन्मळून पडल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी २९ एप्रिल २०२५ रोजी लागलेल्या आगीत वटवृक्षाच्या खोडाचा मोठा भाग जळून गेला होता. तरीही हा वृक्ष तग धरून उभा होता. मात्र अलीकडील वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या तडाख्यामुळे त्याची मुळे कमकुवत होऊन अखेर हा ऐतिहासिक वृक्ष जमीनदोस्त झाला.
लिंबागणेशच्या जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या या वटवृक्षाच्या सावलीत अनेक सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक घडामोडी घडल्या. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींशी हा वृक्ष घट्ट जोडलेला होता. अनेक पिढ्यांनी त्याच्या छायेत विसावा घेतला, गप्पांचे फड रंगले आणि विविध कार्यक्रमांचे साक्षीदार होण्याचा मान या वृक्षाला लाभला होता.
निसर्गाचा हा अमूल्य ठेवा कोसळल्याने ग्रामस्थ भावुक झाले असून, गावाच्या इतिहासातील एक जिवंत स्मृती हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अशा ऐतिहासिक वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment