फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी
फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी
पाटोदा (प्रतिनिधी) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने गुरुवारी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. "फडणवीस सरकार मुर्दाबाद", "शेतकरी विरोधी सरकार हाय हाय", "संपूर्ण कर्जमाफी द्या", "शेतकरी एकजूट जिंदाबाद" अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अपुरी, दिशाभूल करणारी व लाखो शेतकऱ्यांना वंचित ठेवणारी असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगामुळे राज्यभर संतापाची लाट निर्माण झाली असून शासनाने तात्काळ संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.
किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ. महादेव नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. कर्जमाफीवरील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. घोषणाबाजीमुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर आंदोलनमय झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री, कृषिमंत्री व जिल्हाधिकारी यांना उद्देशून निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी हिताचे निर्णय तातडीने न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Comments
Post a Comment