नेकनूर अप्पर तहसील कार्यालयात लिंबागणेश मंडळाचा समावेश करण्यास ग्रामस्थांचा विरोध; हरकत नोंदविण्याचा निर्धार
लिंबागणेश:-( दि.१८) : बीड तालुक्यातील नेकनूर येथे नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयात लिंबागणेश महसूल मंडळाचा समावेश करण्याच्या हालचालींना लिंबागणेश परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. लिंबागणेश महसूल मंडळाचा सध्याचा कार्यक्षेत्रातील दर्जा कायम ठेवावा व त्याचा नेकनूर अप्पर तहसील कार्यालयात समावेश करू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी बीड, तहसीलदार बीड यांना पाठविण्यात आले.
या संदर्भात गुरुवारी (दि. १८) लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत सरपंच बालासाहेब जाधव, माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ गिरे, माजी सरपंच कल्याण वाणी, बाळकृष्ण थोरात,बाळासाहेब मोरे पाटील,सुरेश निर्मळ, अँड.गणेश वाणी, रमेश गायकवाड,दादा गायकवाड, सर्पमित्र अशोक जाधव,गणपत तागड, संतोष भोसले, नामदेव वाणी, शिवाजी पवार, रामदास मुळे, सय्यद अकबर, भगवान मोरे,बबन गिरे, श्रीकांत कानिटकर,सुंदरराव जाधव, संजय घोलप, विठ्ठल कदम, संजय सुकाळे, रामदास वाणी, मोहनराव कोटुळे, विनायक वाणी, सुधाकर बागल, जिवन मुळे,तुळशीराम काटकर,
यांच्यासह विविध गावांतील नागरिक उपस्थित होते. यावेळी डॉ.गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे पाटील, रमेश गायकवाड, तुळशीराम काटकर यांनी बैठकीत ठाम भूमिका मांडली.
सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले की, लिंबागणेश महसूल मंडळातील नागरिकांना बहुतांश तालुका व जिल्हास्तरीय कामांसाठी बीड येथे जावे लागते. अशा परिस्थितीत महसूल कामांसाठी नेकनूर येथे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी पुन्हा बीडला जावे लागल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जाणार आहेत. विशेषतः वृद्ध, महिला आणि शेतकरी वर्गाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे लिंबागणेश महसूल मंडळातील १७ गावांतील ग्रामस्थ या निर्णयाला कडाडून विरोध करतील तसेच संबंधित ग्रामपंचायतींकडूनही हरकती दाखल केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील प्रशासकीय विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने नवीन अप्पर तहसीलदार कार्यालयांच्या स्थापनेसंदर्भात सुधारित आराखडा प्रसिद्ध केला आहे. महसूल विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांच्या स्वाक्षरीने ११ जून रोजी विभागीय आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार बीड तालुक्यातील नेकनूर येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे.
या प्रस्तावित कार्यालयांतर्गत नेकनूर, येळंबघाट, मांजरसुंबा, चौसाळा आणि लिंबागणेश या पाच महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. तर बीड, पाली, घाटसावळी, नाळवंडी, म्हाळसजवळा, पिंपळनेर, कुर्ला, पेंडगाव, पारगाव (सिं), राजुरी (नवगण) आणि चऱ्हाटा ही मंडळे बीड तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कायम राहणार आहेत.
१५ दिवसांत हरकती दाखल करण्याची संधी
प्रस्तावित सीमा व कार्यक्षेत्राबाबत संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानंतर नागरिकांना १५ दिवसांच्या आत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. प्राप्त हरकतींचा अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत ७ जुलैपर्यंत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
लिंबागणेश महसूल मंडळात १७ गावांचा समावेश
लिंबागणेश महसूल मंडळात सहा तलाठी सज्जे असून त्यामध्ये लिंबागणेश, पोखरी, पिंपरनई, बेलखंडी (पाटोदा), पाटोदा (बे), नागझरी, अंजनवती, रौळसगाव, घारगाव, लोणीघाट, बोरखेड, महाजनवाडी, मुळुकवाडी, मसेवाडी, बेलगाव, सोमनाथवाडी आणि फुकेवाडी या १७ गावांचा समावेश आहे.
ग्रामस्थांच्या मते, प्रशासकीय सोयीसुविधांच्या नावाखाली नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक व प्रवासाचा भार पडणार असेल तर शासनाने प्रस्तावाचा पुनर्विचार करावा. त्यामुळे आगामी काळात या विषयावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment