डॉ.गणेश ढवळे यांना प्रतिष्ठित "क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार" जाहीर
डॉ.गणेश ढवळे यांना प्रतिष्ठित "क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार" जाहीर!
भ्रष्टाचाराविरुद्ध आणि प्रशासकीय दिरंगाईविरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या खंबीर युद्धाचा होणार सन्मान!
बीड (प्रतिनिधी)(दि.०५ )आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत बीड जिल्ह्यातील स्थानिक समस्यांना वाचा फोडणारे आणि जनसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर यांना यंदाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठित "क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे. 'साप्ताहिक युवा लोकमित्र' वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आणि ६ व्या वर्षात पदार्पण सोहळ्याचे औचित्य साधून 'युवा लोकमित्र परिवार'च्या वतीने या सर्वोच्च सन्मानाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
साप्ताहिक युवा लोकमित्र'तर्फे समाजातील अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या आणि समाजहितासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या खऱ्या लढवय्यांचा गौरव केला जातो. यंदाच्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने डॉ. गणेश ढवळे यांच्या अष्टपैलू, निर्भीड आणि जनहितैषी आंदोलनात्मक कार्याची या सर्वोच्च सन्मानासाठी एकमुखाने निवड केली आहे.डॉ. गणेश ढवळे हे बीड जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक आहेत. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता त्यांनी बीड जिल्ह्यातील स्थानिक पायाभूत समस्या, प्रशासकीय दिरंगाई आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमीच कडक भूमिका घेत आवाज उठवला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हक्क अबाधित राहावेत यासाठी त्यांनी आजवर अनेक यशस्वी आंदोलने, मोर्चे आणि धरणे आंदोलने केली आहेत. प्रशासनाला झुकवून जनतेला न्याय मिळवून देणारा एक हक्काचा आणि निर्भीड नेता म्हणून त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.यापूर्वी त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल 'राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्कार', 'मराठा भूषण पुरस्कार' आणि 'समाज भूषण पुरस्कार' अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या याच पुरस्कारांच्या शृंखलेत आता 'युवा लोकमित्र'च्या या अत्यंत मानाच्या आणि तडफदार पुरस्काराची भर पडली आहे.
२० जून रोजी भव्य सोहळ्यात वितरण
हा दिमाखदार आणि गौरवशाली पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता 'ताज पॅलेस', कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक, आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच गरिमामयी उपस्थितीत डॉ. गणेश ढवळे यांच्या संघर्षमय प्रवासाचा विशेष गौरव करण्यात येईल.
"डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा तर केलीच,पण एक सजग नागरिक आणि आंदोलनकर्ते म्हणून बीड जिल्ह्याला न्याय मिळवून दिला आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अशा निर्भीड नेतृत्वाला क्रांतीवीर अशफाक उल्ला खान यांच्या नावाने 'राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार' देताना युवा लोकमित्र परिवाराला सार्थ अभिमान वाटत आहे."
— शेख ताहेर जाफर संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. गणेश ढवळे यांच्यावर बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, डॉक्टर मित्र, राजकीय नेते, तरुण वर्ग आणि नागरिक व मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा उत्स्फूर्त वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment