एसटी बीड विभागातील नियमबाह्य बदल्या व बढत्यांची चौकशी करून विभाग नियंत्रकांवर कारवाई करा- बबन वडमारे
बीड । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागात दि. 1 जानेवारी 2024 पासून झालेल्या बदल्या, बढत्या, पदनियुक्त्या आणि प्रतिनियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी तसेच विभाग नियंत्रक यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी इंटकचे प्रादेशिक सचिव बबनराव वडमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, मुंबई तसेच मध्यवर्ती कार्यालयातील सुरक्षा व दक्षता अधिकार्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, बीड विभागात विविध पदांवरील बढत्या आणि बदल्या करताना सेवा ज्येष्ठतेचे निकष डावलण्यात आले असून नियम व परिपत्रकांना बगल देत काही कर्मचार्यांना लाभ मिळवून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाहक ते लिपीक-टंकलेखक तसेच वाहक ते वाहतूक नियंत्रक या पदांवरील पदोन्नती प्रक्रियेत वरिष्ठतेचा विचार न करता निर्णय घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच चालक, वाहक, सहाय्यक वाहतूक नियंत्रक, एटीआय, टीआय, पर्यवेक्षक आणि इतर पदांवरील नेमणुका व प्रतिनियुक्त्यांमध्येही नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून अनेक निर्णय हे नियमांच्या चौकटीबाहेर जाऊन घेण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारीत वाहतूक निरीक्षकांच्या बदल्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. महामंडळाच्या संबंधित परिपत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविणे अपेक्षित असताना काही प्रकरणांमध्ये त्या नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही अधिकार्यांच्या बदल्या करताना पर्याय न मागविता किंवा निर्धारित निकष न लावता निर्णय घेण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय काही वाहतूक निरीक्षक व इतर अधिकार्यांच्या बदल्या अन्यायकारक पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून कार्यकाळ पूर्ण न झालेल्या कर्मचार्यांनाही बदलीला सामोरे जावे लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचार्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, बदल्यांमध्ये अंशतः बदल करून देण्यासाठी काही मध्यस्थांमार्फत आर्थिक व्यवहारांची मागणी करण्यात आल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमून सर्व संबंधित कागदपत्रे, आदेश आणि बदली प्रक्रियेची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीड विभागातील दि. 1 जानेवारी 2024 पासून आजपर्यंत झालेल्या सर्व बदल्या, बढत्या, प्रतिनियुक्त्या, पदनियुक्त्या आणि प्रशासकीय आदेशांची स्वतंत्रपणे तपासणी करण्यात यावी. तसेच या सर्व प्रकरणात विभाग नियंत्रक यांची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी आणि दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी इंटकचे प्रादेशिक सचिव बबनराव वडमारे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
Comments
Post a Comment