रोहित पवार यांच्या अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात दीपक देशमुख यांचा सहभाग; गौतम आगळे यांचा जाहीर पाठिंबा
परळी / पंढरपूर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत असून, परळी नगरीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख तसेच रोजंदारी मजदूर सेनेचे केंद्रीय महासचिव गौतम आगळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारसमोर शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. 2019 च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ 50 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच एकवेळ समझोता (OTS) योजनेतही ही अन्यायकारक अट रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, 2 लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी उर्वरित रक्कम भरण्याची अट न घालता थेट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी लागू करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रोत्साहनपर अनुदानासाठी सलग दोन वर्षे नियमित कर्जफेडीची अट रद्द करावी, तसेच 2017 च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या 6.56 लाख शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.
शेतकरी हिताच्या दृष्टीने पीकविमा योजनेतील शेतकरीविरोधी जाचक अटी व ट्रिगर काढून टाकून 1 रुपयांत पीकविमा योजना पुन्हा सुरू करावी, तसेच पेरणीपूर्वी कर्ज खात्यांचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांच्या खात्यात आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्यांना पेरणीसाठी आर्थिक मदत मिळू शकेल, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनस्थळी बोलताना दीपक देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्याची गंभीर दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे सांगितले. तर गौतम आगळे यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी रोजंदारी मजदूर सेना खंबीरपणे आंदोलनाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी परिसरातील विविध संघटनांचे पदाधिकारी,मुन्ना केशव मस्के व कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Comments
Post a Comment