झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे

मायबाप सरकार प्रकाशदादा, विजयसिंह पंडित राजे चिमुकल्यांवर दया करा.....

झाडाखाली भरतोय वर्ग, जीव धोक्यात घालून शिकतात विद्यार्थी; काळेगाव थडीच्या शाळेसाठी निधी द्या – डॉ. गणेश ढवळे
बीड:- (दि.१९) माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील काळेगाव थडी केंद्र टाकरवण येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने सध्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे वर्ग झाडाखाली भरवले जात आहेत. त्यामुळे मायबाप सरकार माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तातडीने निधी उपलब्ध करून या विद्यार्थ्यांवर उपकार करावेत, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सन १९६३ मध्ये विटा व चुन्यापासून उभारण्यात आलेली शाळेची इमारत आज मरणासन्न अवस्थेत आहे. भिंतींना मोठमोठे तडे गेले असून छतावरील पत्रे गंजून गळती होत आहे. सिमेंटचे खपले सतत कोसळत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वर्गखोल्यांमध्ये साप-विंचू आढळण्याच्या घटनाही वारंवार घडत आहेत.

या धोकादायक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसवून शिक्षण द्यावे लागत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काकडे यांनी सांगितले. अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही अद्याप नवीन इमारतीचे काम सुरू झालेले नाही.

सीईओ जितीन रेहमान यांना निवेदन

डॉ. गणेश ढवळे यांनी याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषद बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान यांची भेट घेऊन शाळा इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सीईओ यांनी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती माजलगाव यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून दोन वर्गखोल्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून मंजुरी मिळताच निधी उपलब्ध करून बांधकाम सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. किरण कुंवर यांनी दिले आहे.

मात्र मंजुरीच्या प्रक्रियेत वेळ जात असताना विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि सुरक्षितता दोन्ही धोक्यात आले आहेत. त्यामुळे शासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नवीन शाळा इमारतीसाठी निधी मंजूर करावा, अशी जोरदार मागणी पालकांकडुन होत आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी