पीएमश्री शाळेलाच कुलुप ! शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा ! आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील शाळेसंदर्भात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार
पीएमश्री शाळेलाच कुलुप ! शिक्षकांविना शिक्षणाचा बोजवारा ! आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील शाळेसंदर्भात थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार : डॉ. गणेश ढवळे
बीड:- (दि.१७) : आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील पीएमश्री दर्जा प्राप्त जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, या गंभीर प्रकाराची दखल घेऊन केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांची तपासणी करण्यात यावी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
डॉ. ढवळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारची "पीएमश्री योजना" ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार देशभरातील शाळांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आदर्श शाळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल लायब्ररी, आधुनिक क्रीडा सुविधा, सुरक्षित पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या योजनेसाठी केंद्र शासनाकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून ४० टक्के निधी उपलब्ध करून दिला जात असून प्रत्येक शाळेसाठी सरासरी १ कोटी ८० लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च केला जात आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात ८०० हून अधिक शाळांची निवड करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील १३ शाळांना पीएमश्री योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
मात्र आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा येथील पीएमश्री शाळेत गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाने वारंवार शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, दिनांक १५ जून रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून "शाळा प्रवेशोत्सव" आणि "१०० शाळांना भेटी" हा विशेष उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात येत असताना त्याच दिवशी संतप्त पालक व ग्रामस्थांनी हरिनारायण आष्टा येथील शाळेला कुलूप ठोकून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या घटनेमुळे पीएमश्री योजनेअंतर्गत शाळांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे डॉ. ढवळे यांनी म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्व १३ शाळांची स्वतंत्र तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, रिक्त पदे तात्काळ भरावीत तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment