जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "रांजण ठेवले पण पाणीच नाही ! पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "रांजण ठेवले पण पाणीच नाही ! पुष्पहार घालून, श्रीफळ फोडून गांधीगिरीतून प्रशासनाचा निषेध :- डॉ.गणेश ढवळे
बीड, दि. १५ : शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना तसेच आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी वारंवार निवेदने व लक्ष्यवेधी आंदोलने झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन रांजण ठेवून पाणपोई सुरू केल्याचे दाखविले. मात्र काही दिवसांतच ही व्यवस्था केवळ दिखाऊ ठरल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
या रांजणांमध्ये नियमितपणे पाणी भरले जात नसल्याने पाणपोई अनेकदा कोरडी राहत असून नागरिकांची गैरसोय होत आहे. या कथित निष्काळजीपणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १५) डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली कोरड्या रांजणाला पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून गांधीगिरीच्या मार्गाने जिल्हा प्रशासनाच्या संवेदनहीन कारभाराचा निषेध करण्यात आला.
यावेळी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आदी शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, तसेच आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड व स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शेख युनुस, मुबीन शेख, भिमराव कुटे, सय्यद सादेक, रामधन जमाले, पठाण रफिक, गणेश पांचाळ, आकाश कळसकर , अँड.योगेश टेकाडे आदी सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment