परळीत हिटलरशाहीचा कारभार?पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी?

परळीत हिटलरशाहीचा कारभार?

पत्रकार गृहनिर्माण संस्थेला दिलेली जागा नमो उद्यानासाठी कशी?

पत्रकारांच्या हक्काच्या ६० गुंठे जागेवर डल्ला टाकण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्र्यांकडे दाद मागणार – दीपक देशमुख
परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी नगरपालिकेच्या कारभारात लोकशाहीपेक्षा हुकूमशाहीचेच वर्चस्व वाढत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या जागेवर नमो उद्यान उभारण्याच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पत्रकारांच्या हक्काच्या जागेची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी नंदागौळ रोड परिसरातील संबंधित जागेवर प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब कडबाने, प्रकाश सूर्यकर, आत्मलिंग शेटे, धीरज जंगले, बाबा शेख, धनंजय अरबुने, संतोष जुजगर, प्रल्हाद कडुकटले, बालाजी ढगे, सुकेशनी नाईकवाडे, संजीब रॉय, संदीप मस्के, बालाजी जगतकर, गौतम आगळे, पद्माकर भंडारे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

नगराध्यक्षांच्या हितासाठी जागेचा वापर?

परळीचे विद्यमान नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची संबंधित जागेजवळ शेती असल्याचा उल्लेख करत दीपक देशमुख यांनी गंभीर आरोप केला की, नमो उद्यान उभारल्यास परिसरातील जमिनींचे भाव वाढतील आणि त्याचा थेट फायदा काही मोजक्या व्यक्तींना होऊ शकतो. याच उद्देशातून पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी राखीव असलेली ६० गुंठे जागा नमो उद्यान प्रकल्पात समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

१५ वर्षांपूर्वीचे आश्वासन धुळीस मिळाले?

देशमुख म्हणाले की, सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते सर्व्हे क्रमांक ४२२ मधील ६० गुंठे जागेचे पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी भूमिपूजन करण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र आज त्याच जागेवर नमो उद्यान उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

"जागा एकच, योजना मात्र अनेक"

नगरपालिकेच्या मालकीच्या या जागेचा विविध काळात डम्पिंग ग्राउंड, घनकचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प, अग्निशामक दलाचा तळ, न. प.कर्मचारी निवासस्थान, सुशिक्षित बेकार सप्तशृंगी संस्थेला ही हीच जागा,ऑक्सिजन पार्क आणि काही दिवसांनी पत्रकार गृहनिर्माण संस्था अशा विविध योजनांसाठी जागेचा वापर करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले. आता त्याच जागेवर नमो उद्यानाचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याने "जागा एकच आणि फलक मात्र वेगवेगळे" अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका त्यांनी केली.

दिवंगत पत्रकारांच्या स्मृतींचा प्रश्न

पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या भूमिपूजनाचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ कदम, प्रशांत जोशी, दिलीप बदर आणि सतीश बियाणी यांच्यासह अनेक पत्रकार आज हयात नाहीत. त्यांच्या स्मृतींचा सन्मान राखण्यासाठी तरी पत्रकारांसाठी राखीव असलेली जागा पत्रकारांनाच देण्यात यावी, अशी भावनिक मागणी यावेळी करण्यात आली.

संघर्षाची तयारी

"जोपर्यंत पत्रकार गृहनिर्माण संस्था नियोजित जागेवर प्रत्यक्ष उभी राहत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहील," असा निर्धार व्यक्त करत दीपक देशमुख यांनी लवकरच परळीतील पत्रकार गृहनिर्माण संस्थेचे कार्यकारी मंडळ व पत्रकार, संपादक आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांची, खासदार बजरंग सोनवणे याची भेट घेणार असल्याचे जाहीर केले.

पत्रकारांवर दबाव टाकल्याचा आरोप

या कार्यक्रमाला काही पत्रकार अनुपस्थित राहिल्याबाबतही देशमुख यांनी गंभीर आरोप केले. कार्यक्रमात सहभागी झाल्यास जाहिराती बंद केल्या जातील किंवा भविष्यात अडचणी निर्माण केल्या जातील, अशा प्रकारचा दबाव काही पत्रकारांवर टाकण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. पत्रकारांना अशा पद्धतीने गप्प बसविण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मराठा भवन प्रकरणाची आठवण

अलीकडेच मराठा भवनासाठी देण्यात आलेल्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख करत देशमुख यांनी नगरपालिकेच्या जमीन वाटप प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. संबंधित जागेवर श्री दत्त देवस्थान ट्रस्टने आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. त्याचप्रमाणे पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या जागेबाबतही प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

पत्रकारांच्या हक्कासाठी लढा कायम

नोंदणी क्रमांक AF-22856 असलेल्या पत्रकार गृहनिर्माण संस्थेसाठी सर्व्हे क्रमांक ४२२ मधील ६० गुंठे जागा कायम राखावी, तिचा विकास करावा आणि पत्रकारांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी या प्रतिकात्मक उद्घाटन सोहळ्यातून करण्यात आली. पत्रकारांच्या हक्काच्या या प्रश्नाला आता नवे राजकीय व सामाजिक परिमाण प्राप्त होत असून येत्या काळात हा विषय अधिक गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी