देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने – डॉ. गणेश ढवळे
बीड, दि. ८ : देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच सामाजिक व धार्मिक सलोखा जपण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करण्यात यावे, देशातील सर्व कत्तलखाने बंद करावेत, मांस निर्यातीवर बंदी घालावी आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधानाच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी, या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ८) बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व अधोरेखित करत गोसंवर्धन, पशुधन व्यवस्थापन आणि शेतकरीहिताचे दीर्घकालीन धोरण राबविण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
आंदोलनात अँड .शेख शफीक भाऊ , शेख युनुस, शेख मुबीन, मुस्ताक शेख,सय्यद सादेक,रामधन जमाले,, हनुमान घोडके,भीमराव कुटे, बाजीराव ढाकणे, डॉ.संजय तांदळे, सरफराज खान, प्रा.ज्ञानेश्वर राऊत, अमर शेख,सय्यद अब्दुल करीम,आदी सहभागी झाले होते.
प्रमुख मागण्या
१) देशहित, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक व धार्मिक सलोखा राखण्यासाठी गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे.
२)देशातील सर्व कत्तलखाने सरसकट बंद करण्यात यावेत.
३) विदेशात होणाऱ्या मांस निर्यातीवर बंदी घालण्यात यावी.
४) गोवंश हत्याबंदी कायद्याची संविधान व कायद्याच्या चौकटीत निःपक्षपणे अंमलबजावणी करावी.
५) मांस व्यवसाय व मांस निर्यात क्षेत्रात कार्यरत उद्योगांसाठी एकसमान व पारदर्शक धोरण लागू करावे.
६)गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही समाजघटकाला लक्ष्य न करता सर्वांना समान व निःपक्ष न्याय द्यावा.
७) पशुधन व्यवस्थापन, गोसंवर्धन, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे दीर्घकालीन धोरण राबवावे. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment