पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप

पोखरी (घाट) येथील शेतकऱ्यांच्या ३ दुभत्या म्हशींचा संशयास्पद मृत्यू; विषप्रयोगाची शंका, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा आरोप
लिंबागणेश (दि. ६) : बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील शेतकरी विश्वंभर मुरलीधर खिल्लारे यांच्या तीन दुभत्या म्हशींचा अवघ्या दोन दिवसांत संशयास्पद मृत्यू झाला असून चौथी म्हैसही मरणासन्न अवस्थेत आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणात विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पशुवैद्यकीय विभागाच्या अनास्थेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.

विश्वंभर खिल्लारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हशी आजारी पडताच त्यांनी लिंबागणेश येथील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन करूनही कोणीही तपासणीसाठी आले नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर त्यांना खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून उपचार घ्यावे लागले. औषधोपचारासाठी सुमारे २० हजार रुपयांचा खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्याशी बोलताना विश्वंभर खिल्लारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “माणसाने हात धरून मारावे, पण मुक्या जनावरांचा तळतळाट घेऊ नये,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या वर्षीदेखील त्यांच्या चार गायींचा एकाचवेळी संशयास्पद मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मृत जनावरांचे शवविच्छेदन अहवाल तपासावेत, विषप्रयोग झाला आहे का याचा शोध घ्यावा तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी