वंचित बहुजन आघाडीच्या मागणीची प्रशासनाने घेतली दखल; बोगस पाणंद रस्ता प्रकरणी चौकशी समिती स्थापन
पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यातील कथित बोगस पाणंद रस्ता कामांच्या चौकशीसाठी वंचित बहुजन आघाडीने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, पंचायत समिती पाटोदाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेघडंबर व तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी दिनांक 29 मे 2026 रोजी पंचायत समितीकडे निवेदन देऊन तालुक्यातील पाणंद रस्ता कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.या मागणीची दखल घेत पंचायत समिती पाटोदाने दिनांक 3 जून 2026 रोजी पत्राद्वारे चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती दिली आहे.गट विकास अधिकारी यू. एम. सानप यांनी दिलेल्या पत्रानुसार, चौकशी समितीमार्फत संबंधित प्रकरणाची तपासणी करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच 4 जून 2026 रोजी प्रस्तावित आंदोलन मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पाटोदा यांच्या आंदोलनाची प्रशासनाने मागणीची दखल घेतल्याने तालुक्यातील पाणंद रस्ता कामांबाबतचे वास्तव समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौकशी अहवालानंतर संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, चौकशी निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment