पैसे भरूनही टँकर गायब! नाशिकमध्ये पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा
यूसूफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक:- आगाऊ पैसे देऊनही तेल कंपन्या दोन ते तीन दिवस टँकर उपलब्ध करीत नाहीत. उशिरा इंधन मिळत असल्याने टँकर आल्यानंतर काही तासांत पेट्रोल पंप कोरडेठाक अर्थात ड्राय होत आहेत.
मागणी व पुरवठ्यात विसंगती असून या अडचणींचा सर्वाधिक परिणाम शेतकरी वर्गावर होत असल्याची बाब नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने मांडली आहे. संबंधितांच्या निवेदनानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी पेट्रोलियम कंपन्यांना तातडीने पत्र लिहून नाशिक जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर तातडीने उपाय योजण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील पेट्रोल पंपधारकांना सध्या पेट्रोल व डिझेल पुरवठ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीमुळे पेट्रोल पंप चालक, ग्राहक, शेतकरी तसेच कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशनने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात व्यक्त केली. पेट्रोलियम कंपन्या अनेकदा डीलर्सकडे पैसे उपलब्ध नसल्याचे कारण सांगतात. परंतु, त्यात तथ्य नाही. संघटनेच्या माहितीनुसार जवळपास ९७ टक्क्यांपेक्षा जास्त डीलर्सचे पैसे आगाऊ भरलेले असतात. तरीदेखील लवकर टँकर उपलब्ध केला जात नसल्याचा गौप्यस्फोट संघटनेने केला आहे.
अनेक पंपांवर टँकर वेळेवर मिळत नसल्याने तो आल्यानंतर ग्राहकांची गर्दी उसळते आणि काही तासांत पंप कोरडाठाक अर्थात ड्राय होतो. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम, नाराजी आणि तणाव निर्माण होत आहे. एखाद्या ग्राहकाला २५० ते ३०० लिटरपेक्षा अधिक डिझेल वा पेट्रोल दिले तर ही माहिती ऑनलाईन कंपनीकडे दिसून येते. अनेकदा कंपनीकडून डीलरचा पुढील पुरवठा थांबवला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. मागणी व पुरवठ्यात विसंगती आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम होत असल्यास प्रशासनाने खुलासा करावा. तेल कंपन्यांनी डीलर्सविषयी चुकीचे कारण देणे थांबवावे. कंपन्यांकडे पैसे उपलब्ध नसलेल्या डीलर्सची माहिती असेल तर ती प्रशासनाकडे सादर करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
शेतीची कामे, कृषी वाहतुकीवर परिणाम
पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विपरित परिणाम शेतीच्या कामांवर झाला आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री, शेतमाल वाहतुकीसाठी डिझेलवर अवलंबून आहेत. डिझेल वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे शेतमाल वेळेत बाजार समितीत पोहोचत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांना प्राधान्याने इंधन पुरवठा करावा, शेतकरी व कृषी वापरासाठी डिझेल उपलब्धतेस प्राधान्य द्यावे, शेतमालाच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाकडून तेल कंपन्यांना सूचना?
पेट्रोल डीलर्स संघटनेने या समस्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या कंपन्यांना पत्र लिहिले आहे. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांना प्राधान्याने इंधन पुरवठा करावा, शेतकरी व कृषी वापरासाठी डिझेल उपलब्धतेस प्राधान्य द्यावे आणि बाजार समिती व कृषी वाहतुकीवर परिणाम होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी सूचना तेल कंपन्यांना करण्यात आली आहे. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
Comments
Post a Comment