अंजनवती येथील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करा-नितीन सोनवणे

 

बीड तालुक्यातील अंजनवती येथील किरण बंडू सोनावणे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. लिंबागणेश–अंजनवती मार्गावरील गणेशमाळ परिसरात किरण सोनावणे यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ MH 16 AR 2661 क्रमांकाची दुचाकी आढळली असून वाहन केवळ खाली पडलेल्या अवस्थेत होते. वाहनाचे कोणतेही गंभीर नुकसान दिसून न आल्याने या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना अपघात नसून गळा दाबून खून झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून सत्य बाहेर आणावे, अशी मागणी नागरिकांसह ऑल इंडिया पॅंथर सेना सामाजिक संघटनांकडून होत आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेने प्रशासनाकडे या प्रकरणात तात्काळ भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, घटनेच्या वेळेत त्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या संशयितांची चौकशी, निष्पक्ष वैद्यकीय पथकाकडून इन-कॅमेरा पोस्टमार्टम, सर्व पुरावे जतन करून पारदर्शक तपास आणि दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ता तथा जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले की, “हा केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचा प्रश्न नसून कायद्याच्या राज्यावर जनतेचा असलेल्या विश्वासाचा प्रश्न आहे. बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने गांभीर्याने तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.”

दरम्यान, किरण बंडू सोनावणे यांच्या निधनाबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी