“पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” ; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने

“पाणी-स्वच्छतेची भिक नको परंतु मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा” ; नगरपरिषद कार्यालयासमोर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांची निदर्शने :- डॉ.गणेश ढवळे 
बीड (दि.१५) : बीड शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१५ शुक्रवारी नगरपरिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. बालकांवर होत असलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादावरुन सुरू असलेल्या कलगीतुरा आणि मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

“पाणी, स्वच्छता आदी मूलभूत सुविधा दिल्या नाहीत तरी चालेल, पण आधी बालकांवर होणारे मोकाट कुत्र्यांचे हल्ले थांबवा,” अशी संतप्त घोषणाबाजी आंदोलकांनी केली. यावेळी नगरपरिषद प्रशासनाने केवळ कागदोपत्री नसबंदी मोहीम न राबवता प्रत्यक्षात कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणावी व शहरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

मुख्याधिकारी नगरपरीषद यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, रामनाथ खोड,सय्यद सादेक , रामधन जमाले, डॉ.संजय तांदळे, बाजीराव ढाकणे आदी सहभागी झाले होते.

बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चौकाचौकात कुत्र्यांच्या टोळ्या दिसत असून त्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः पेठ बीड, बार्शी नाका, मोमीनपुरा, झमझम कॉलनी या भागांमध्ये नागरिकांना व लहान मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

दि.१४ मे रोजी पंढरी नगरी परिसरात एका ६ वर्षीय बालकावर कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून कुत्र्यांना हुसकावून लावल्याने बालकाचा जीव वाचला. मात्र अशा घटनांनंतरही नगरपरिषद प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कुत्र्यांची नसबंदी मोहीम प्रभावीपणे राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी डॉ. गणेश ढवळे यांनी दिला.

सत्ताधारी विरोधकांचा श्रेयवादावरुन कलगीतुरा 

बीड नगरपरीषद मधील सत्ताधारी आणि विरोधक यांचा श्रेयवादावरुन कलगीतुरा सुरू असुन बीड शहरातील मोकाट कुत्र्यांनी बालकांवर केलेल्या हल्ल्याचे गांभीर्य दिसून येत नाही.याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी