मिलिंद सरपते यांना राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार जाहीर
बीड, दि. १३ (प्रतिनिधी) – समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय राज्यस्तरीय नावलौकिक पद्मपाणी पुरस्कार यंदा बीड जिल्ह्यातील मादळमोही (ता. गेवराई) येथील युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट समाजकार्य, जनआंदोलने आणि विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
मिलिंद सरपते यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्नांवर आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी भवन ते लेडी नाला रस्ता मंजूर करून घेण्यासाठी केलेले आंदोलन आणि प्रभावी पाठपुरावा विशेष चर्चेचा विषय ठरला होता. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व म्हणून त्यांनी बीड जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग, लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, प्रशासनावर असलेला प्रभावी वचक आणि विनम्र स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वत्र आदराने पाहिले जाते. त्यांच्या या निवडीमुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रविवार, दि. १७ मे रोजी बीड येथे आयोजित भव्य समारंभात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मिलिंद सरपते यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment