पोस्ट कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर द्या,बीड शहर बचाव मंचाची मागणी
बीड | प्रतिनिधी
बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने आज बीड मुख्य पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्टर यांची भेट घेऊन विविध जनहिताच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पोस्ट कार्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता, त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
खाजगी तसेच सहकारी बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार आणि दिवाळखोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास पुन्हा एकदा शासकीय पोस्ट कार्यालयांकडे वाढताना दिसून येत आहे. पोस्टाच्या विविध बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढल्याने कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याची बाब मंचाच्या पाहणीत निदर्शनास आली.
या पार्श्वभूमीवर बीड शहर बचाव मंचाने पोस्ट प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या —
🔹 सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावेत.
🔹 महिला व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
🔹 कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करावी.
यावेळी बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीनजी जायभाये, माजी राष्ट्रवादी सेवा दल जिल्हाध्यक्ष पाशाभाई शेख, पत्रकार शाम मार्कंडे आदी उपस्थित होते. पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले.
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी पोस्ट प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment