परळी पंचायत समितीत ग्रामसेवकांची कमतरता; नागरिकांची कामे रखडली



परळी वैजनाथ प्रतिनिधी :
परळी वैजनाथ पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन कामांवर होत आहे. पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवकांची एकूण ६२ पदे मंजूर असताना त्यापैकी केवळ ५१ ग्रामसेवक कार्यरत आहेत, तर तब्बल ११ पदे रिक्त आहेत. त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे अतिरिक्त गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे.

सध्या अनेक ग्रामसेवकांकडे एका पदासोबत आणखी ३ ते ४ गावांचा अतिरिक्त कार्यभार असल्याने कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अनेक ग्रामसेवक हे दररोज १०० ते १६० किलोमीटर अंतरावरून अपडाऊन करत असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक कामे रखडत आहेत. रहिवासी दाखला, पीटीआर नक्कल, जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, हयात दाखला तसेच विविध शासकीय कागदपत्रांसाठी ग्रामस्थांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे ग्रामीण नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, अतिरिक्त कार्यभारामुळे काही ठिकाणी आर्थिक मागण्या वाढत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी एका ग्रामसेवकाला एक हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. संबंधित ग्रामसेवकाकडेही अतिरिक्त गावांचा कारभार असल्याची चर्चा होती.

रिक्त पदे तातडीने भरून ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश काटेकोरपणे लागू करावेत, अशी मागणी आता ग्रामीण भागातून जोर धरत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी