बीडमध्ये रखडलेले राष्ट्रीय महामार्गाचे काम, अवैध कत्तलखाने प्रकरणी भाजप आक्रमक



बीड (प्रतिनिधी)
दि.१५ : शहरातून जाणाऱ्या अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर परिसरातील मस्जिदजवळ आणि बार्शी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रखडलेल्या रस्ता व नाली कामांबाबत तसेच अवैध कत्तलखान्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना शुक्रवारी (दि.१५) निवेदन दिले आहे. रखडलेली कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावीत, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, भाजप नेते डॉ.योगेश क्षीरसागर, ॲड.सर्जेराव तांदळे, यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ वरील बालेपीर भागातील नाली व रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे पवनसुत मंगल कार्यालयापासून ते कर्परा नदीपर्यंत रस्त्याच्या दक्षिणेकडील वस्त्यांमधील नाल्यांचे सांडपाणी अहिल्यानगर रोडलगतच्या नालीमध्ये येते. मात्र, तेथून पुढे कर्परा नदीकडे जाणाऱ्या नालीचे काम पूर्ण झाले नसल्याने अनेक नाल्यांचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांची उत्पत्ती आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सदर नालीचे काम आजपर्यंत पूर्ण का झाले नाही, असा सवालही करण्यात आला आहे. तसेच बालेपीर दर्गाजवळील रस्त्याच्या दक्षिण बाजूचे १५ मीटर रुंदीचे रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दक्षिण बाजूचे काम रखडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बालेपीर दर्गा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रखडलेल्या कामांबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग व उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या माहितीनुसार हा रस्ता ३० मीटर रुंदीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून नॅशनल हायवे ॲक्ट १९५६ तसेच कंट्रोल ऑफ नॅशनल हायवे ॲक्ट २००२, ॲक्ट नं.१३ ऑफ २००३ नुसार आपल्या हद्दीतील रस्त्याचे काम आजपर्यंत पूर्ण का करण्यात आले नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे. याशिवाय बालेपीर दर्ग्याच्या जागेची शासकीय मोजणी करण्यात आली आहे का, असा प्रश्न उपस्थित करत मोजणी झाली नसल्यास ती तातडीने करून दर्ग्याच्या हद्दीबाहेरील अतिक्रमणे हटवावीत. कर्परा नदीची मोजणी करून नदीपात्रातील अतिक्रमणे हटवावीत व दक्षिणेकडील परिसरातील नागरिकांसाठी रस्त्याची कनेक्टिव्हिटी खुली करून द्यावी. तसेच सदर रस्त्यावरील अतिक्रमणे आजपर्यंत का हटविण्यात आली नाहीत आणि रखडलेल्या रस्ता व नाली कामांची माहिती १५ दिवसांच्या आत द्यावी. रखडलेल्या रस्ता व नाली कामकाज एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव शांतीनाथ डोरले, नगरसेवक शुभम धूत, सावित्रीताई नितीन साखरे, मीनाताई जाधव, मीनाताई रणजितसिंह चव्हाण, भाग्यश्रीताई देशपांडे, जगदीश गुरखदे, राहुल गुरखुदे, मंगेश धोंगडे, भाग्यश्री तांबारे, पूजाताई राजाभाऊ गुजर, समीक्षा शेटे, सय्यद मुस्तफा, आदित्य माने, ज्योतीताई नंदकिशोर पिंगळे यांच्यासह भाजप, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
अवैध कत्तलखान्यावर कठोर कारवाई करा : शंकर देशमुख

बीडसह जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली आहे. तसेच, गोरक्षकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस प्रशासनाने स्वतःहून कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा गोरक्षकांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी