लिंबागणेश येथील त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाची शांतीब्रम्ह तुकाराम महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता
लिंबागणेश (दि.०२) : बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिरात श्रीगुरू ईश्वरभारती महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित त्रिदिनी अखंड हरिनाम व भावार्थ रामायण कथा सप्ताहाची सांगता आज दि.०२ शनिवार रोजी श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात करण्यात आली.
दि.३० एप्रिल ते ०२ मे दरम्यान पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. महादेव भारती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपाच्या दिवशी शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या ओव्यांद्वारे प्रभावी व सुश्राव्य किर्तन सादर करत उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
“तुझिये संगती जाली आमुची निश्चिंती, नाही देखिले ते मळे, भोग सुखाचे सोहळे” या अभंग ओव्यांचा दाखला देत भगवंताच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. संत साहित्याच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देण्यात आला.
सप्ताह काळात ह.भ.प. बबन महाराज मंझरीकर व ह.भ.प. प्रेममुर्ती धर्मराज दादा सामनगावकर यांनीही सुश्राव्य किर्तन सेवा दिली. या त्रिदिनी सप्ताहात काकडा, भजन, शिवलीलामृत, पारायण, गाथा पारायण, भावार्थ रामायण, हरिपाठ, हरिकिर्तन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
समारोप प्रसंगी काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Comments
Post a Comment