१७ वर्षांनंतर जुळला आठवणींचा गोफ; निगमानंद विद्यालयाच्या २००९ बॅचचे स्नेहसंमेलन उत्साहात
बीड प्रतिनिधी : निमगाव (मा.) येथील निगमानंद विद्यालयाच्या सन २००९ च्या १० वीच्या बॅचचे स्नेहसंमेलन बीडमधील हॉटेल सनराईज येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. तब्बल १७ वर्षांनंतर शालेय मित्र-मैत्रीण एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि आनंदाला उधाण आले. या सोहळ्याला अर्जुन थिटे सर, बेंद्रे सर, डोंगरदिवे सर आणि अशोक खोपडे सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. स्वाती थिटे, आजिनाथ आंधळे, जगदीश लोणके (फौजी), विशाल खेडकर, डॉ. मच्छिंद्र भोसले, डॉ. संदीप सटले यांच्यासह अनेक मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील किस्से शेअर केले.
मान्यवर गुरुजनांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्वांनी आपापल्या करिअर आणि कौटुंबिक प्रवासाविषयी माहिती दिली. स्नेहभोजनाच्या आस्वाद घेत गप्पांचा कार्यक्रम रंगला.
"शाळा सुटली तरी मैत्री सुटली नाही," अशी भावना व्यक्त करत, पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.
Comments
Post a Comment