सम्राट अशोक व त्यांचे राज्य.
सम्राट अशोक व त्यांचे राज्य.
भारतीय इतिहासातील स्वर्णिम अक्षराने कोरलेल्या दिव्यपुरुष सम्राट अशोकांचे राज्य व त्या काळातील समाज व्यवस्था आणि इतर गोष्टी कशा होत्या ह्या शोधून काढण्यासाठी देशी-विदेशी इतिहास संशोधक आपल्या जीवाची पराकाष्टा करताना आपल्याला दिसतात. तथापि सम्राट अशोकांचे राज्यव्यवस्था व समाजस्थिती कशी होती हे आजवर व्यवहारिक दृष्टीने किंबहुना मुद्दामून दाबून दडपून टाकलेले आहे. अशोकाचे लक्ष जरी प्रजेत धर्म शिक्षणाचा प्रसार करण्याकडे असले तरी त्यांनी कधीही राजाच्या इतर कर्तव्याकडे केव्हाही दुर्लक्ष केले नाही! चंद्रगुप्ताच्या वेळी मगधसाम्राज्याचा विस्तार जितका होता व अशोकाने त्यात किती भर घातली याविषयी अनेक संशोधकांनी आपल्या पुस्तकात पुष्कळपणे लिहिले आहे. या प्रकरणात त्याचे विवेचन करणे गरजेचे नसले तरी अशोकाच्या राज्यविस्ताराचा मी यात सूक्ष्मपणे विवेचन करणार आहे. सम्राट अशोकाने कलिंग सारखे मोठे राज्य जिंकून ते मगध साम्राज्याला जोडले ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. दक्षिणेतील चोल, पांड्य, सातियपुत्र म्हणजे सत्यपुत्र व केरळपुत्र ही किरकोळ राज्ये सोडली तर बाकीचा सारा हिंदुस्तान मगधसाम्राज्यात अंतर्भूत होता. याशिवाय सध्याच्या प्रजासत्ताक भारत देशाच्या मर्यादेच्या बाहेरचे कित्येक देश अशोक सम्राटाच्या राज्यात होते. ग्रीक राज्यातील अनेक प्रांत जसे आरिया, आरकिसिया, सारखे व अफगाणिस्तान, बलूच्सिस्तान सध्याचे पाकिस्तान, ब्रह्मदेश, नेपाळ व भूतान अशा देशांवर त्यांचा अंमल होता. याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणून तिथे अध्यापही भग्न स्थितीत असलेल्या अनेक स्तंभ-स्तूप वगैरेंकडे बोट दाखविता येईल. एवढ्या मोठ्या साम्राज्यात शांतता व शिस्त राखण्याचे व लोकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करून त्यांच्या हरएक प्रकारच्या उन्नतीच्या तजविजी करण्याचे काम आजच्या तांत्रिक-अनुशक्तीक युगातही सांभाळणे फार दुर्लभ मानले जाते. परंतु सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने हे दुष्कर कामे केवळ आपल्या बुद्धी सामर्थ्याने करून दाखवले आहेत. सम्राट अशोकाने आपल्या राज्यविस्तारात ब्राह्मी लिपीला महत्त्वाचे स्थान देऊन त्यास धम्म लिपीचा दर्जा देऊन धर्मप्रसाराचे महत्कार्य केले. भगवान बुद्धांचे अनेक उपदेश आपल्या राज्यात केवळ शिळावरच न कोरता प्रजेच्या मनामनात कोरले. सम्राट अशोकाने राज्यविस्तार केल्यानंतर आपल्या राज्याची पाच प्रांतात विभागणी केली. पैकी मगधप्रांताचा कारभार राजा स्वतः पाहत होता. आणि बाकीच्या चार प्रांतांवर चार सुभेदारांची नियुक्ती केली होती. हे चार सुभेदार कुमार म्हणजे राजकुलिन पुरुषांपैकी होत.(बहुदा राजपुत्र नेमण्याची वहिवाट चंद्रगुप्ताच्या वेळेपासूनच चालत आली होती.) हे सुभेदारांचे चार प्रांत म्हणजे तक्षशिला, सुवर्णगिरी, उज्जयनी आणि तोसली हे होत. याचा उल्लेख कलिंग धौली,ब्रह्मगिरी वगैरे ठिकाणीच्या सम्राट अशोकाच्या लेखातून मिळतो. काश्मीर व पंजाब हे तक्षशिला प्रांतात गुजरात, काठेवाड, माळवा हे उज्जयनी प्रांतात तर सगळा दक्षिण प्रांत सुवर्णगिरीच्या इलाख्यात आणि पूर्व किनाऱ्यावरील कलिंग व आसपासचा प्रदेश तोसली प्रांतात मोडत असे. अफगाणिस्तान, मक्राण, खोतान वगैरे सरहद्दीवरील प्रांतावर एक स्वतंत्र अधिकारी होता असे कित्येक लेखकांचे म्हणणे आहे. चंद्रगुप्ताची राज्यपद्धती राजशक्तीवर असली तरी ती फारशी विस्तार पावली नाही. परंतु सम्राट अशोकाची राज्यपद्धती ही धर्मशक्ती आणि नैतिकशक्ती वर अधिष्ठित असल्यामुळे त्यांनी मगधसाम्राज्याचे दृढीकरण केले, व धर्म राज्याची स्थापना केली. सम्राट अशोकांनी ठरविलेल्या धोरणाच्या तंत्राने सर्व कारभार चालत असे. तसेच राज्याच्या सुव्यवस्थेसाठी कायदे करण्याचे कामही राजा स्वतः मंत्र्यांच्या सल्ल्याने करीत असत. सम्राट अशोकाच्या राज्यात न्यायव्यवस्था ही प्रखर होती. दोषींनाही आपले म्हणणे सांगणे तिथे अपरिहार्य होते. सम्राट अशोकाच्या साम्राज्यात भाषा विकास आणि स्थापत्यकलेचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. तसेच जकात धोरण, लष्करी खाते,परदेशीय यवन अधिकारी, जमीन महसूल व पाटबंधारे खाते, वाणिज्य व व्यवसाय, वैद्यकीय सेवा,शिक्षणप्रसार आणि सामाजिक जीवन आजच्या काळापेक्षा तेव्हा अधिक सुकर असल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे.
अशा भारतीय इतिहासाच्या निर्मात्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
लेखक
आदर्शराजे विकासराव जोगदंड.
(लेखक फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक तथा इतिहास संशोधक आहेत.)
Comments
Post a Comment