निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे
फोटोसेशन आणि पुरस्कारापुरता वृक्षलागवडीचा दिखावा; “इव्हेंट जिल्हाधिकारी” यांनी विवेक जागा ठेवून वृक्षसंगोपणाची जबाबदारी निश्चित करावी ! निदान जिल्हाधिकारी यांच्या नावाची पाटी असलेलं झाडं तरी जगवा :- डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.२९): हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जागतिक विक्रमाच्या उद्देशाने एकाच दिवशी ३० लाख झाडे लावण्याची मोहीम राबविण्यात आली होती. मात्र बीड प्रशासनाने प्रत्यक्षात ७० लाख झाडे लावल्याचा दावा करत विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांची दिशाभूल केली. यासोबतच ९० टक्के झाडे जिवंत असल्याचा दावा देखील प्रशासनाने केला आहे.
प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच दिसून येत आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावलेले खंडेश्वरी दिपमाळ परीसरात झाड देखील जिवंत ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. पाली येथील नविन रेल्वे स्थानक परिसरात उद्घाटनावेळी लावण्यात आलेली १२ ते १५ फूट उंचीची झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांच्या नावाचे फलक लावण्यात आलेल्या झाडांचेही संगोपन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची बाब समोर आली असून ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी व्यक्त केली आहे.
लागवडीचा केवळ दिखावा नको; संगोपणाची जबाबदारी निश्चित करा
हवामान बदल, प्रदूषण आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केल्याचा गाजावाजा करण्यात आला. या उपक्रमाची नोंद ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाल्याचा दावा करत त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी यांचा सन्मानही करण्यात आला होता.
दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कडेला १२ ते १५ फुट उंचीची मोठमोठाली झाडांची मोठ्या उत्साहात वृक्षलागवड करण्यात आली. या झाडांसोबत मान्यवरांच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या होत्या.
मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर कोणत्याही विभागाने या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पालवण येथील नव्या रेल्वे स्थानक परिसरातील अनेक झाडे पाण्याअभावी वाळण्याच्या मार्गावर आहेत.
यामुळे केवळ फोटोसेशन आणि पुरस्कारांसाठी वृक्षलागवड करण्यापेक्षा प्रत्यक्ष संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने “वृक्षलागवड”सोबत “वृक्षसंगोपन”लाही तितक्याच गांभीर्याने घेतले पाहिजे, वृक्षसंगोपणाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment