लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी
लिंबागणेश परिसरात रानडुकरांचा उपद्रव; पिकांचे मोठे नुकसान, नुकसानभरपाईची मागणी
सौर कुंपण योजना सरसकट लागू करण्याची मागणी – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि.३१) : बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
“रात्री पाणी देताना जीव धोक्यात” – रामदास मुळे (नुकसानग्रस्त शेतकरी)
सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका यांसारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले.
तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली.
---
सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी – डॉ. गणेश ढवळे
डॉ. श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजनेअंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण यांसारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे.
Comments
Post a Comment