लिंबागणेश येथे गतिरोधकाच्या मागणीसाठी पत्रकार हरिओम क्षीरसागर यांचा आमरण उपोषणाचा इशारा



(लिंबागणेश प्रतिनिधी)

 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी (मांजरसुंबा – पाटोदा) मार्गावरील लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयासमोर तसेच गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गतिरोधक बसविण्याच्या मागणीसाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार हरिओम सुधीरराव क्षीरसागर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार आश्वासन देऊनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
या संदर्भात दि. १२ जून २०२५ रोजी झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा होऊन स्थळ पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार दि. २६ जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही दि. ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी संबंधित विभागाला गतिरोधक बसविण्याचे लेखी आदेश देण्यात आले होते.
मात्र, या सर्व प्रक्रियेनंतरही संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी आदेशांची दखल न घेता आजपर्यंत गतिरोधक बसविण्यात आलेले नाहीत. परिणामी, शाळकरी विद्यार्थी यू तसेच ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याबाबत अनेक वेळा निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर हरिओम क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत कार्यालय, लिंबागणेश समोर दि. २४ मार्च २०२६ मंगळवार रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. “विद्यार्थ्यांची व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात हा लढा असून मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गतिरोधक बसविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी