आवकाळी पावसाचा तडाखा; रामपुरीत ज्वारीचे पिके भुईसपाट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
आवकाळी पावसाचा तडाखा; रामपुरीत ज्वारीचे पिके भुईसपाट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
नुकसान भरपाई चे तात्काळ पंचनामे करा - विश्वनाथ शरणागत
बीड | प्रतिनिधी
गेवराई तालुक्यात आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आवकाळी पावसासह जोरदार वादळी वाऱ्याने हजेरी लावली. या अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे मौजे रामपुरी येथील शिवारात मोठ्या प्रमाणावर ज्वारीची पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रामपुरी येथील लिंबाजी रामभाऊ मस्के यांच्या शेतात प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, भरघोस उभे असलेले ज्वारीचे पीक वादळाच्या तडाख्याने जमिनीवर कोसळलेले दिसून आले. काही ठिकाणी संपूर्ण शेती आडवी झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
रामपुरी हे गाव गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. यापूर्वी गोदावरीच्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र त्या वेळीही महसूल प्रशासनाकडून योग्य पंचनामे करण्यात आले नाहीत किंवा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही, अशी तीव्र नाराजी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
आता पुन्हा एकदा आवकाळी पावसाने वादळाच्या रूपाने घाव घातल्याने रामपुरीतील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. जिल्हाधिकारी व संबंधित प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, तसेच मागील पुरग्रस्त शेतकऱ्यांनाही त्वरित मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
नैसर्गिक आपत्तींच्या मालिकेमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडत चालले असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment