बड्या प्रकल्पांचा मुंबई महापालिकेवर बोजा,ठेवी मोडण्याची वेळ
यूसूफ पठाण प्रतिनिधी
मुंबई प्रतिनिधी :पालिकेच्या मोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी २ लाख ४४ हजार कोटींच्या पुढे गेली असून, येत्या आर्थिक वर्षात ४१ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर उर्वरित दायित्वे पुढील चार-पाच वर्षांत महापालिकेला द्यावी लागणार आहेत. पालिकेच्या एकूण मुदत ठेवी जानेवारी २०२६ अखेरीस ८१ हजार ४४९ कोटींपर्यंत असून त्यातील २८,०६० कोटी या करता वापरले जाणार आहेत. त्यापैकी १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत, तर १४,२९५ कोटी रुपये प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प बुधवारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीला सादर केला. या प्रकल्पात कोणत्याही नवीन प्रकल्पांची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आधीच्याच प्रकल्पांची प्रचंड देणी पालिकेवर असून या कर्जाच्या ओझ्याखाली मुंबई महापालिका दबली असल्याचेच चित्र आहे. सागरी किनारा मार्गाचा उपनगरातील टप्पा, जलबोगद्यांची कामे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे, पुलांची कामे अशा मोठमोठ्या प्रकल्पांबरोबरच दैनंदिन देखभालीच्या कामांची देणी यात समाविष्ट आहेत.
हे प्रकल्प चार-पाच वर्षे चालणारे असून ही देणी मुंबई महापालिकेला येत्या चार-पाच वर्षांत द्यावी लागणार आहेत. महापालिकेतील प्रकल्पांची देणी २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात १.९० लाख कोटी होती, तर २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात वाढून २,३२,४१२ कोटींवर गेली आहेत. हे दायित्व आता २ लाख ४४ हजार कोटींवर गेले आहे. हा खर्च भागवण्यासाठी ठेवी वापरण्यात येणार आहेत.
पालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षात भांडवली खर्चासाठी ४८,१६४ कोटींची तरतूद केली आहे. मात्र हा सगळा खर्च मुदत ठेवी आणि राखीव निधी यातूनच केला जाणार आहे. पालिकेकडे जकातीची नुकसानभरपाई, मालमत्ता कर आणि विकास नियोजन म्हणजेच पुनर्विकासातून मिळणारे उत्पन्न हे तीन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.
खर्च कसा भागवणार
एके काळी ९१ हजार कोटींवर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजातील आकडेवारीनुसार जानेवारी २०२६ अखेरीस ८१,४४९ कोटी रुपये आहेत. मुदत ठेवीपैकी ३६,६२३ कोटी हे प्रकल्पांसाठी राखीव ठेवलेले आहेत. त्यापैकी १४,२९५ कोटी या प्रकल्पांसाठी वापरले जाणार असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. तर आस्थापना खर्च व निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी असलेल्या ४४ हजार कोटींच्या राखीव निधीतून १३,७६५ कोटी हे तात्पुरते अंतर्गत कर्ज म्हणून घेतले जाणार आहेत.
ठेवींना ग्रहण
पालिका निवडणुकीच्या तोंडावर या मुदत ठेवींचा मुद्दा चर्चेत आला होता. मुदत ठेवी चाटायच्या आहेत का, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिशेष रकमेच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये असतात. त्या मुदत ठेवींवरून पालिकेच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येत असतो. पालिकेच्या मुदत ठेवी मार्च २०२२ मध्ये तब्बल ९१ हजार कोटींच्या पुढे गेल्या होत्या. मात्र त्यानंतर या मुदत ठेवींना उतरती कळा लागली आहे.
कोणत्या मोठ्या प्रकल्पांची किती देणी?
एकूण ६३ मोठ्या प्रकल्पांची देणी महापालिकेला येत्या काही वर्षांत द्यायची आहेत. ही देणी २ लाख ४४ हजार कोटींची आहेत. त्यात रस्ते काँक्रीटीकरणाची कामे, गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता, वर्सोवा-दहिसर सागरी किनारा, दहिसर-भाईंदर जोडरस्ता या कामांची देणी २ लाख १३ हजार कोटी आहेत. तर आरोग्य, घनकचरा, इमारत परीक्षण अशा पालिकेच्या विविध खात्यांच्या लहानमोठ्या कामांची ३१,४०६ हजार कोटीेंची देणी आहेत. त्यापैकी येत्या आर्थिक वर्षात ४१,३९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
एकूण मुदत ठेवी – ८१,४४९ कोटी
तात्पुरते अंतर्गत कर्ज – १३,७६५ कोटी
राखीव निधीतून प्रकल्पांसाठी खर्च – १४,२९५ को
Comments
Post a Comment