महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा !जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन
लोकशाही वाचवा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या
महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणात गुन्हे दाखल करा !
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन
बीड (दि.२३) – बीड शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी उभे असलेले महावितरणचे विद्युत खांब व उघड्यावरील रोहित्रांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे, तसेच महावितरण व हायटेक कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गोरे वस्ती येथील १५ वर्षीय आवेज परवेज शेख याचा विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या वेळी “आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या!”, “लोकशाही वाचवा!” अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात शेख युनुस,मुबीन शेख, शेलार शिवशर्मा,माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी), रामधन जमाले ( जिल्हाध्यक्ष इंटक), शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, राजेंद्र आमटे, शेतकरीपुत्र हक्क आंदोलक,किष्किंधा पांचाळ ( अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था बीड) शेख तालेब (पत्रकार सिटीझन), नितिन जायभाये ( अध्यक्ष बीड शहर बचाव विचारमंच) , प्रा . राजकुमार कदम,प्राचार्य डी.जी.तांदळे ( जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य किसान सभा बीड) डॉ.संजय तांदळे ( अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संघटना बीड), बाजीराव ढाकणे, शेख बशीर ( राज्याध्यक्ष म.र.जि.प.सेवा निवृत्त कर्मचारी संघटना), शेख वाजेद,शेख इमरान,शेख रिजवान,शेख सरफराज,शेख आमेर,शेख रीयाज, सय्यद नवाब,शेख तौफीक, विठ्ठल सवासे आदी
सहभागी होते
आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करा
गोरे वस्ती, बीड येथील १५ वर्षीय आवेज परवेज शेख या निष्पाप मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक व नागरिकांनी न्याय मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. मात्र, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन महावितरण व हायटेक कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.
शहरातील विजेचे खांब व रोहित्र सुरक्षित करा – ३ कोटी निधीची मागणी
बीड शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेले १५७ विजेचे खांब व १७ रोहित्र तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात यावेत. जमिनी लगत उघडे असलेले रोहित्र किमान १० फूट उंचीवर संरक्षित करावेत.
यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
महावितरणमध्ये संगनमताने कोट्यवधींचा गैरव्यवहार?
बीड जिल्ह्यात महावितरण कार्यालयात अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने बोगस कामे दाखवून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. गेवराई तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या दुरुस्ती खर्चात अनियमितता झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित प्रकरणात चौकशीचा फार्स करून ठोस कारवाई टाळली जात असल्याचा आरोप करण्यात आला.
पत्रकारांवरील खोटे गुन्हे रद्द करा
TV9 Marathi चे बीड जिल्हा प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्यावर नेकनूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा तात्काळ रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच दैनिक लोक इच्छा चे संपादक इमाद इनामदार यांना शासकीय कामातील अनियमिततेबाबत चौकशी केल्यामुळे धमकी देणाऱ्या कंत्राटदार मसुराम कदम यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रमुख मागण्या
आवेज परवेज शेख मृत्यू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत
शहरातील धोकादायक विजेचे खांब व रोहित्र सुरक्षित करावेत
महावितरणमधील गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
Comments
Post a Comment