अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा २१ फेब्रुवारी रोजी बीडमध्ये



बीड (प्रतिनिधी) :
दक्षिण पीठ, नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन पादुकांचे भव्य दर्शन सोहळा शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बीड–जालना रोड, श्री संत सेवालाल महाराज चौक, कॅनॉल रोड, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.

रामानंद संप्रदायाच्या वतीने देशभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, या कार्याची व्याप्ती व्यापक आहे. संस्थानमार्फत राष्ट्रीय महामार्गांवर ५४ विनामूल्य रुग्णवाहिका सेवा सुरू आहे. गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून बारावीपर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. व्यसनमुक्ती अभियानातून लाखो लोकांना नवजीवन मिळाले आहे.

याचबरोबर दि. ४ जानेवारी ते १८ जानेवारी या १५ दिवसांच्या कालावधीत संप्रदायाच्या माध्यमातून १ लाख ७१ हजार १५० रक्तकुप्यांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाला दान करण्यात आले, जो एक विश्वविक्रम मानला जात आहे. तसेच १३३ अवयवदान आणि १७९ देहदान विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना सुपूर्द करण्यात आले आहेत. “पाणी अडवा, पाणी जिरवा” उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात ४५९८ कच्चे बंधारे बांधण्यात आले असून जलसंधारण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य झाले आहे.

महाड, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी येथील पूरपरिस्थितीत संप्रदायामार्फत धान्यवाटप, स्वच्छता मोहीम व इतर मदतकार्य राबविण्यात आले. दरवर्षी पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, शाळांना प्रयोगशाळा साहित्य, तसेच शेतकऱ्यांना गाई, म्हशी, शेळ्या, कृषी पंप साहित्य व बियाणांचे वाटप केले जाते.

दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होणार असून, सकाळी १० वाजेपर्यंत शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहोचेल. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पादुका व गुरुपूजन सोहळा, जगद्गुरु पादुका पूजन, सामाजिक उपक्रमांतर्गत ८१ सायकलींचे गरजू बांधवांना वाटप, प्रवचन, आरती सोहळा, उपासक दीक्षा, दर्शन, महाप्रसाद तसेच पुष्पवृष्टीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

या भव्य सोहळ्यास बीड तालुका व जिल्हाभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार असून, सर्व भक्तगणांनी गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेऊन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हा रामानंद संप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी