आमची प्रगती आरक्षणामुळे नाहीतर बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मामुळे झाली आहे - डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन

मौजे शिवणी येथे अखिल भारतीय चौथी बौद्ध धम्म परिषद उत्साहात साजरी 

बीड(प्रतिनिधी):- अनुसूचित जाती जमातीमध्ये ५९ जातींना आरक्षण मिळत आहे. आमची प्रगती मूळ आरक्षणामुळे झाली नाही तर आमची प्रगती बाबासाहेबांनी दिलेल्या बौद्ध धर्मामुळे झाली आहे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी केले. प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीड यांच्या विद्यमाने ६७ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवार दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता महाविहार धम्मभूमी डॉ. भदंत आनंद कौसल्यायान नगर मौजे शिवणी येथे चौथी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले होते. या धम्मपरिषदेत प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतु तथा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर धम्म परिषदेला शिवणी येथे बोलत होते .
पुढे बोलताना डॉ. राजरत्न आंबेडकर म्हणाले की, १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी भदंत चंद्रमणी यांच्या उपस्थितीमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बौद्ध होण्यापूर्वी आम्ही विविध जातीमध्ये विभागले गेले होतो. मनुस्मृतीने दिलेल्या कामांमध्ये अडकून गेलो होतो. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध केलं त्यांनी केलेल्या क्रांतीमुळे आमची प्रगती झाली असे डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी भाषणादरम्यान सांगितले. बाबासाहेबांनी अनेक धर्मांची चिकित्सा केली प्रत्येक धर्मात जातीय व्यवस्था असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे बाबासाहेबांनी भारतात लुप्त झालेल्या विज्ञानवादी बौद्ध धर्माची निवड करून धम्म दीक्षा घेतली. बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा धर्मग्रंथ तुमच्यासाठी लिहिला आहे. माझा लढा पैशासाठी, जमिनीसाठी, संपत्तीसाठी नाही तर माझा लढा आत्मसन्मानासाठी आहे असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. त्यामुळे आपली ओळख महार, मातंग, चांभार, ढोर अशी न करता आपली ओळख १३८ देशांमध्ये बौद्ध म्हणून निर्माण करा असे डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताबाहेर आपली ओळख बौद्ध म्हणून दाखवतात असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. सम्राट अशोका नंतर भारतामध्ये खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी बुद्ध धम्म जिवंत केला. आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यास १३८ देशांमध्ये हे बौद्ध आहेत यांच्यावर अन्याय झालाय, अत्याचार झालाय असे सांगितल्यावर १३८ देश आपल्या पाठीमागे उभे राहतील असे बाबासाहेब सांगून गेले आहेत. भारतामध्ये बौद्ध धर्माची चळवळ कशी पुढे नेतायेईल यासाठी काम करत असल्याचे डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले. जातीच्या विळख्यातून बाहेर पडा, राजकीय झेंडे हाती घेण्यापेक्षा धम्मध्वज हाती घ्या असे त्यांनी आवाहन केले.भिक्खू शरणानंद महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौथ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद मध्ये आंबेडकरवादी मिशनचे दिपक कदम, द बुध्दिष्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत जाधव,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिनेश हनुमंते,महाराष्ट्र राज्य संघटक वैभव धबडगे,सत्यशोधक ओबीसी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदिप उपरे बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. बौद्ध परिषदचे उद्घाटन भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले.सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. माजी गटविकास अधिकारी रविंद्र तुरुकमारे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था सचिव भिक्खू धम्मशिल थेरो यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. प्रास्ताविक प्रा.प्रदिप रोडे यांनी केले. यावेळी पु.भिक्खु ज्ञानरक्षित थेरो,पु.भिक्खु करुणानंद थेरो,पु.भिक्खु डॉ.इन्दवंस्स महाथेरो- कुशीनगर ,पु.भिक्खु धम्मबोधी थेरो,पु.भिक्खु रत्नदीप थेरो,पु.भिक्खु धम्मानंद,पु.भिक्खु एस.नागसेन,पु.भिक्खु अनुरुद्ध थेरो इत्यादी पुज्य भिक्खु संघाने उपस्थितांना धम्मदेसना देऊन मंञमुग्ध केले.सूत्रसंचालन प्रा.उत्तम साळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी मानले. या बौद्ध धम्म परिषदला पंचक्रोशीतील हजारो बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी