हायटेक सिग्नल की हायटेक भ्रष्टाचार ? सुरू होण्यापूर्वीच कोसळले ! बीडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! कारवाईची मागणी :- डॉ.गणेश ढवळे


बीड (दि.०२):
शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या गाजावाज्यात बसविण्यात आलेले ६४ लाख रुपये खर्चाचे हायटेक सिग्नल सुरू होण्यापूर्वीच कोसळल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका परिसर आणि शिवराज पान सेंटर चौक या चार ठिकाणी प्रत्येकी १६ लाख रुपये खर्चून सिग्नल बसविण्यात आले होते. मात्र नगर नाका परिसरातील सिग्नल अवकाळी पावसाच्या तडाख्यात कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यापूर्वीही लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले सिग्नल देखभाल अभावी निष्प्रभ ठरले आहेत. त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल तरी टिकणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

डॉ. ढवळे यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हायटेक सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागेल; पण निकृष्ट काम करणाऱ्यांना कोण शिस्त लावणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या सिग्नलचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पोलच लाल, पिवळा व हिरवा रंग दाखवतो, त्यामुळे वाहनचालकांना दूरवरून सिग्नल स्पष्ट दिसतो. तसेच ‘स्मार्ट टाइम मॅनेजमेंट’ तंत्रज्ञानामुळे ज्या बाजूला वाहनांची गर्दी अधिक असेल, त्या दिशेला हिरवा दिवा जास्त वेळ दिला जातो. मात्र प्रत्यक्षात सिग्नल कोसळल्याने या योजनेची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

सर्वेसर्वा आ.विजयसिंह पंडित यांनी लक्ष द्यावे :- डॉ.गणेश ढवळे 

बीड नगरपरिषद ताब्यात आणण्यासाठी आ . विजयसिंह पंडित यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सत्ताधारी नगरसेवक वारंवार सोशल मीडिया आणि दैनिकात बातम्या प्रसारित करताना उल्लेख करतात. आ.विजयसिंह पंडीत यांनी सुद्धा मागील ४० वर्षांपासून नगरपरिषदेत सुरू असलेला अनागोंदी कारभार आपण संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नशील असुन बीडकरांना दिलासा देण्याबाबत वारंवार अधोरेखित केले आहे. त्यामुळे आ.विजयसिंह पंडित यांनी तब्बल ६४ लाख रुपये खर्चून आठवडाभरापूर्वी बसविण्यात आलेले हायटेक सिग्नल अवकाळी पावसाने सुरू होण्यापूर्वीच कोसळले असल्याने संबंधित प्रकरणात कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी