शेतकरी आत्महत्या; शवविच्छेदनासाठी नातेवाईकांची दोन तासांची प्रतीक्षा, आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह



लिंबागणेश (दि.१४) : बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी लक्ष्मण भानुदास क्षीरसागर (वय ५२) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी (दि.१४) दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच लिंबागणेश पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश परझने, मन्सुर शेख व अविनाश घुंगरड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला.

मात्र, येथे शवविच्छेदनासाठी आवश्यक साधनसामग्री व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश आंधळे यांनी मृतदेह नेकनुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत सुमारे दोन तासांचा विलंब झाला. त्यामुळे मयताचे नातेवाईक रामदास क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, दशरथ क्षीरसागर तसेच सरपंच सुनिल अनपट यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला.

दरम्यान, लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याचा प्रकार यापूर्वीही अनेकदा घडल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या संदर्भात डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत नाराजी व्यक्त केली. यावर डॉ. गंडाळ यांनी अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची व साहित्याची कमतरता असल्याचे सांगितले. तसेच संबंधित प्रकरणात नेकनुर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी