लिंबागणेश येथे गोरक्षकांनी पकडला गायींनी भरलेला पिकअप; निर्दयी वाहतुकीचा प्रकार उघड, पोलीस डिपार्टमेंट आमचेच म्हणत गोरक्षकांना धमकी.
लिंबागणेश प्रतिनिधी |
लिंबागणेश येथे गोवंशाची निर्दयी पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सकाळी अंदाजे पाऊणे सातच्या सुमारास भालचंद्र विद्यालयासमोर गोरक्षकांनी गायींनी भरलेला पिकअप टेंपो अडवला.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव येथील पतीत पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहित बागल व त्यांच्या सहकाऱ्यांसह लिंबागणेश येथील काही युवकांनी संशयित वाहन अडवून तपासणी केली. यावेळी पिकअपमध्ये ७ ते ८ गायी अत्यंत निर्दयी पद्धतीने एकमेकांना घट्ट बांधून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. काही गायींच्या पायाखाली इतर गायी दाबल्या गेल्याचे दिसून आले असून एका गायीचा फास लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, वाहनातील व्यक्तींनी स्थानिक नेत्याचे नाव घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच “पोलीस विभाग आमचाच आहे” अशी धमकी देत गोरक्षकांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांना संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नितीन धायगुडे व पोलीस कॉन्स्टेबल विद्वान कांबळे , लिंबागणेश पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी गणेश परजने यांनी घटनास्थळी धाव घेत वाहन व गाई, बैल, गोवंश इत्यादी ताब्यात घेतले. संबंधित गायींवर उपचार करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेवेळी लिंबागणेश येथील सरपंच बालासाहेब जाधव, विकी वाणी, सत्यम मंडलिक, लखन कानिटकर, लखन राऊत, होमगार्ड अनिल कुलकर्णी, ओंकार तागड आदी युवक उपस्थित होते.
Comments
Post a Comment