शेती जमिनीवर अतिक्रमणाचा गंभीर प्रकार; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) —
संत चोखामेळा सहकारी संस्था मर्यादित, परळी वै. यांच्या मालकीच्या शेती जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सन १९६१-६२ पासून सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर शेजारील काही व्यक्तींनी बेकायदेशीर कब्जा करून बांधकाम सुरू केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे नं. ४४० मधील मेसाजी आबाजी जगतकर व सिताराम भोजाजी जगतकर यांच्या सुमारे १० गुंठे जमिनीवर उत्तम भिमा राठोड व संतोष नामदेव राठोड यांनी अतिक्रमण करून थेट बांधकाम सुरू केले आहे. संबंधित बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच, सर्व्हे नं. ४३९ मधील रामकिशन मिराजी जगतकर यांच्या जमिनीवर रमेश उत्तम गित्ते यांनी १० x १०० फुट जागेवर कब्जा करत विहिरीचे साहित्य टाकले आहे. हे साहित्य तातडीने हटवून जमीन मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, सर्व्हे नं. ४३९ मधील लक्ष्मण नारायण जगतकर व रानबा किशन ताटे यांच्या जमिनीवर एका शेजार्याने तब्बल एक ते दीड एकर क्षेत्रावर बांधकाम व तळ्याचे साहित्य टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप आहे.

या सर्व प्रकरणामुळे संत चोखामेळा सहकारी संस्थेचे सभासद आक्रमक झाले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई करून अतिक्रमण हटवावे, अन्यथा आम्हाला सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून बेकायदेशीर बांधकाम थांबवावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मोकिंद कोंडीबा जगतकर, ब्रिजेस मेसाजी जगतकर, राजेभाऊ साधु मस्के, चंद्रकांत साधु इंगळे, मधुकर विश्वनाथ जोगदंड, राजेभाऊ विठ्ठल जगतकर आदींनी केली आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी