महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का?

महामार्गावर विहिरींचा मृत्युचा सापळा ; प्रवाशांच्या जीवाशी खेळ ! प्रशासनाचे दुर्लक्ष; दिंडोरीसारखी घटना घडण्याची वाट पाहताय का?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार – डॉ. गणेश ढवळे
बीड (दि.०९): बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर तब्बल ५४ अपघात प्रवण (ब्लॅक स्पॉट) स्थळे असताना, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासन व वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे या विहिरी संभाव्य अपघातांचे मोठे कारण ठरत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिल रोजी नुकत्याच घडलेल्या कार विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झालेल्या ज्यात ७ मयत बालकांचा समावेश असलेल्या घटनेचा दाखला देत, “अशीच दुर्दैवी घटना घडण्याची प्रशासन वाट पाहत आहे काय?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.


---

दिंडोरी दुर्घटनेची पार्श्वभूमी

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने कार थेट विहिरीत कोसळली होती. या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात ७ लहान बालकांचा समावेश होता. या घटनेमुळे राज्यभरात रस्त्यालगतच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


---

बीड जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणे

बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला विहिरी असून त्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. काही प्रमुख ठिकाणे पुढीलप्रमाणे:

अहमदपूर–अहिल्यानगर महामार्गावर लिंबागणेशजवळ मुळुकवाडी शिवार

होळ परिसर

धुळे–सोलापूर महामार्गावर चौसाळा जवळ

बीड–शिरूर मार्गावर नागाची वाडी

अंबेजोगाई–लातूर मार्गावर बर्दापूर

कल्याण–विशाखापट्टणम मार्गावर मातोरी पुढे

मादळमोही परिसर

सिरसदेवी फाटा पुढे

शेगाव–पंढरपूर मार्गावर पात्रुड व तांबवा परिसर


या सर्व ठिकाणी विहिरींना मजबूत सिमेंटचे संरक्षण कठडे नसल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे.




 लिंबागणेश जवळील मुळुकवाडी परिसरात गंभीर परिस्थिती

अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग ५४८डी महामार्गावरील लिंबागणेशजवळील मुळुकवाडी शिवारात रस्ता आणि विहीर यामध्ये अंतरच नाही. येथे पूर्वी दोन अपघात झाल्यानंतर डॉ . गणेश ढवळे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्पुरता पत्र्याचा कठडा उभारण्यात आला; मात्र, वेगवान वाहतुकीसमोर तो निष्प्रभ ठरत आहे. येथे मजबूत सिमेंट भिंत उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.


---

यापूर्वीच्या अपघातांच्या घटना

नाग-याची वाडी फाटा (शिरूर कासार रोड): कार विहिरीच्या काठाला धडकून कृष्णा जालिंदर मुळे या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुळुकवाडी (फेब्रुवारी): जीप कठडा तोडून विहिरीजवळ कोसळली (जिवितहानी टळली)

होळ परिसर (ऑगस्ट २०२५): कार विहिरीच्या कठड्याला धडकून एकाचा मृत्यू





मुख्य मागण्या

डॉ. गणेश ढवळे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:

रस्त्यालगतच्या सर्व विहिरींचे तात्काळ सर्वेक्षण

मजबूत सिमेंट संरक्षण भिंती/कठडे उभारणे

धोकादायक ठिकाणी इशारा फलक व प्रकाश व्यवस्था

अपघात प्रवण स्थळांवर तातडीने सुरक्षा उपाययोजना




“अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी