मुस्लिम आरक्षण एल्गार मोर्चाला सामाजिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

बीड (दि.१३): मुस्लिम समाजासाठी लागू असलेले ५ टक्के आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ येत्या १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना लेखी निवेदन सादर करून या मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला. तसेच मुस्लिम समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी आयोजित या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.



“आरक्षणाच्या मागणीबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी”

महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षणाची मागणी अत्यंत महत्त्वाची असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीला पत्र

या संदर्भात सकल मुस्लिम आरक्षण कृती समितीला देखील पाठिंब्याचे पत्र देण्यात आले असून, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर शेख मुबीन, शिवशक्ती-भीमशक्ती विचारमंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, रामधन जमाले (इंटक, बीड जिल्हाध्यक्ष), अशोक येडे (आम आदमी पार्टी, बीड जिल्हाध्यक्ष, माजी सैनिक), सादेक सय्यद ( बीड शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), प्रा.डी.जी.तांदळे (जिल्हाध्यक्ष किसान सभा बीड), सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, सिताबाई भोसले ( जिल्हाध्यक्ष महिला रिपब्लिकन पार्टी बीड)आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असून, १७ एप्रिल रोजी होणाऱ्या मोर्चाकडे लक्ष लागले आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी