जिल्हाधिकारी साहेब, अहिल्यानगर– बीड मार्गावर बेकायदेशीर उत्खनन; तरी पाटोदा प्रशासनाची डोळेझाक? संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घालतय कोण? चौकशी करून कारवाई करा
पाटोदा (प्रतिनिधी ) अहिल्यानगर, जामखेड,सौताडा, रोहतवाडी, नायगाव, बीड या महत्त्वाच्या मार्गावरील रस्त्याच्या कामाच्या आड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मुरूम उत्खननाचा गंभीर प्रकार सुरू असल्याची धक्कादायक तक्रार समोर आली आहे. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने “प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकली जात आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
दिनांक 07 एप्रिल 2026 रोजी तहसील कार्यालय पाटोदा येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, B.R.N. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., जयपूर या कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित कंपनीकडून सौताडा ते शिरापूर फाटा या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान, विशेषतः पाटोदा परिसरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी मुरूम उत्खनन करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.तक्रारीनुसार, गावातील तलाव, पाझर तलाव तसेच गायरान जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर मुरूम काढण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे उत्खनन करताना कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसून, सरळ शासनाच्या महसुलावर डाका टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तक्रारदाराने केवळ लेखी तक्रारच नाही, तर संबंधित उत्खननाचे पुरावे तहसीलदारांना सादर केल्याचा दावा केला आहे. तरीदेखील, एवढे ठोस पुरावे देऊनही तहसीलदारांकडून कोणतीही कारवाई किंवा अधिकृत प्रतिक्रिया समोर न आल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. “तहसीलदार गप्प का?”, “पुरावे असूनही कारवाई का नाही?” असे सवाल आता तीव्रतेने उपस्थित होत आहेत.या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 48(7) अंतर्गत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाची अद्यापची निष्क्रिय भूमिका नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.वेळीच कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, या प्रकरणामुळे पाटोदा परिसरासह संपूर्ण पाटोदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. आता तरी जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासन याकडे लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment