प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात निळा जनसागर उसळला; सनी वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेवर धडक निषेध आंदोलन
बीड प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शहरात दिसून आलेली प्रचंड अस्वच्छता आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार याविरोधात आज सनी वाघमारे यांच्या नेतृत्वात नगरपालिका कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बीड शहरातील नागरिक आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
१४ एप्रिल रोजी जयंती मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी गटाराचे पाणी साचले होते आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही स्वच्छतेची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. या गंभीर निष्काळजीपणामुळे अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याच संतापाचे पडसाद आजच्या आंदोलनात उमटले.
शहरातील अस्वच्छतेसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा.
भविष्यात अशा प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी लेखी हमी द्या.
तुंबलेल्या नाल्यांची आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावून स्वच्छता मोहीम राबवा.
यावेळी बोलताना सनी वाघमारे म्हणाले की, जयंती उत्सवाच्या दिवशी नागरिकांना घाण पाण्यातून चालावे लागले, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. जर आजच्या आंदोलनानंतरही नगरपालिकेने आपली कार्यपद्धती सुधारली नाही, तर आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर यापेक्षाही तीव्र मोर्चा काढण्यात येईल.
या आंदोलनावेळी उपस्थित नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाच्या शेवटी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Comments
Post a Comment